- आशिष सिंहमुंबई: आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्युलच्या आधारे महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट दहशतवादी गटाकडून रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती कल्याण येथील आंबिवली येथे पंजाब ॲन्टी गँगस्टर स्क्वॉडने महाराष्ट्र एटीएससोबतच्या संयुक्त कारवाईत अटक केलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबातून उघड झाली आहे.
पंजाबचा कुख्यात गँगस्टर सोनू खत्री सध्या यूएसमध्ये आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाचा साथीदार होता. नोव्हेंबर, २०२२ मध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे रिंदाचा पाकिस्तानच्या लाहोर येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, रिंदाचा धंदा सोनू खत्रीने आपल्या हातात घेतला.
याच सोनू खत्रीच्या इशाऱ्यावर आपण महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होतो, पण हा घातपात केव्हा, कसा, कधी आणि कोणासाठी होणार, याची कल्पना मात्र आपणास नव्हती. या ऑपरेशनसाठी येत्या काही दिवसांत सूचना मिळणार होत्या, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिवम अवतार महालो, गुरमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा अमनदीप, कुमार गुरमेलचंद उर्फ रन्चो या तिघा संशयितांनी तपास यंत्रणांना दिली आहे.
ब्राझीलमधून भारतात व्यवस्था
जून, २०२२ मध्ये ते बंगळुरूला पोहोचले आणि तेथून थेट रस्ते मार्गाने अंधेरीत आले. अंधेरीतून ठाण्यात पोहोचल्यानंतर रिंदाच्या एका हँडलर जानीने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधत ठाण्यात राहण्याची व्यवस्था केली. रिंदाचा हा हँडलर जम्मू-काश्मीरमध्ये राहणारा असून ब्राझीलच्या बोलविया येथून भारतात रिंदासाठी सारी व्यवस्था करीत होता, परंतु त्याची ठोस माहिती आणि ओळख तपास यंत्रणांकडे अद्याप आलेली नाही.
सीमेपलीकडून मिळायची शस्त्रे
तपास यंत्रणांच्या मते, चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, घातपाती कृत्यांसाठी गेल्या सहा महिन्यांत त्यांना खत्रीकडून पाच ते सहा लाख रुपये वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळाले होते आणि सोनू खत्री त्यांच्या सातत्याने संपर्कात होता. गँगस्टर सोनू खत्री पंजाबच्या बॉर्डर स्टेटच्या आर्म्स डीलर्स गँगसोबत खूप काळापासून संलग्न असल्याने, सीमेपलीकडून बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेकडून येणारी शस्त्रे त्यांना मिळत होती आणि त्याचा वापर सोनू खत्री दहशत पसरविण्यासाठी करत होता. त्यानंतर, हे सहा आरोपी सोनू खत्रीच्या इशाऱ्यावर अंबालामार्गे दिल्लीला आले आणि तीन गटांत विभागले.
सोनू खत्रीने दोन गटांना ५० हजार रुपये देऊन वेगवेगळ्या दिशांना जाण्याच्याही सूचना दिल्या. दिल्ली, अजमेर, बंगळुरू, पुदुच्चेरी, केरळ ते मुंबई प्रवास करीत, तिन्ही संशयित हत्येच्या घटनेनंतर दोन दिवसांत दिल्लीतून पुदुच्चेरीला पोहोचले. पुदुच्चेरीत डॉक्टर म्हणून ओळखला जाणारा रिंदाचा एक साथीदार या आरोपींना भेटला आणि पुदुच्चेरीत एक महिन्यासाठी यांना लपून ठेवण्याचा बंदोबस्तही त्याने केला, शिवाय दोन सिमकार्डही दिली होती. याच्या माध्यमातून ते खत्रीच्या संपर्कात होते. काही दिवस पुदुच्चेरीत राहून ते तिघे केरळला पोहोचले.