संवेदनशील साहित्यिक आणि कर्तबगार अधिकारी, नीला सत्यनारायण यांची साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:42 AM2020-07-17T02:42:24+5:302020-07-17T02:43:51+5:30
अत्यंत यशस्वीपणे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या नीला सत्यनारायण या एकाच वेळी प्रशासकीय सेवा आणि बँकेतील नोकरीच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. बँकेची नोकरी चांगली मानण्याच्या काळात त्या प्रशासकीय सेवेत आल्या.
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आणि निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या कोरोनामुळे झालेल्या निधनाने शोक व्यक्त होत आहे. तब्बल ३४ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत आपल्या कार्यशैलीमुळे त्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून कौतुकास पात्र ठरल्या. याशिवाय ललित लेखन, काव्यसंग्रह, मार्गदर्शनपर पुस्तके आणि अनुवादित साहित्यनिर्मितीसोबत काही चित्रपटांसाठी गीतलेखन करत त्यांनी साहित्य क्षेत्रातही मुशाफिरी केली.
अत्यंत यशस्वीपणे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या नीला सत्यनारायण या एकाच वेळी प्रशासकीय सेवा आणि बँकेतील नोकरीच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. बँकेची नोकरी चांगली मानण्याच्या काळात त्या प्रशासकीय सेवेत आल्या. मंत्रालयात समाज कल्याण, सांस्कृतिक विकास व युवा कार्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क, गृह, महसूल व वने आदी विभागांत सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशी विविध पदे भूषवली.
कोणत्याही प्रश्नावर व्यवहार्य मार्ग काढण्यात त्यांची हातोटी होती. वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहताना मुंबईतील मिल जमिनींचा प्रश्न त्यांनी खुबीने हाताळला. मुंबईचा विकास आणि गिरणी कामगारांना न्याय याचे योग्य संतुलन साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली. या काळात महिला लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे काम करावे यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांसाठी क्रांतिज्योती हा उपक्रम सुरू केला होता.