Join us

मयूर शेळकेंनी गरिबांची भूक जाणली, आदिवासी पाड्यातील गरजूंना धान्यवाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 1:27 PM

नेरळचा रहिवाशी असलेल्या मयूरने लॉकडाऊनची परिस्थिती ओळखून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. पिंपोली ग्रामपंयात परिसरातील 4 आदिवासी गावांत जाऊन मयूरने 115 कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटप केले.

ठळक मुद्देनेरळचा रहिवाशी असलेल्या मयूरने लॉकडाऊनची परिस्थिती ओळखून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. पिंपोली ग्रामपंयात परिसरातील 4 आदिवासी गावांत जाऊन मयूरने 115 कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटप केले.

मुंबई - वांगणी रेल्वे स्थानकावरील पॉईंटमन मयूर शेळकेचा धाडसी बाणा आणि संवेदनशीलपणा आपण या अगोदर पाहिलाच आहे. आता, पुन्हा एकदा मूयर शेळकेनं कौतुकास्पद काम केलंय. आदिवासी पाड्यात जाऊन लॉकडाऊनमुळे हालाकीत असलेल्या गरिबांना अन्नधान्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. आदिवासी भागातील 4 गावांत जाऊन मयूरने धान्याचे कीट वाटप करुन पुन्हा एकदा आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.   

नेरळचा रहिवाशी असलेल्या मयूरने लॉकडाऊनची परिस्थिती ओळखून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. पिंपोली ग्रामपंयात परिसरातील 4 आदिवासी गावांत जाऊन मयूरने 115 कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटप केले. यातील बहुतांश कुटुंब ही दररोजच्या कामावर वेतन मिळवून उदरनिर्वाह करणारी होती. मात्र, सध्या राज्य सरकारने लॉकडाऊन लादल्यामुळे या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या काळात आपण आपल्या शेजारी पहायला हवं. प्रत्येकाने आपल्या शेजारी पाहून गरजूंना मदत केली तर निश्चितच कुणीही भुकेलं राहणार नाही, असे मयूर शेळकेंनी म्हटलंय. 

अंध महिलेच्या मुलासाठीही दिली मदत

एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याचवेळी उद्यान एक्स्प्रेस तेथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळकेने या मुलाचे फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र, मयूरने जीवाची बाजी लावून त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर, देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे मयूरला रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या बक्षीसातील निम्मा हिस्साही मयूरने त्या अंध मातेच्या मुलाच्या शिक्षणासाठी देऊ केला. त्यामुळेही, त्याचे कौतुक झाले होते. 

रेल्वेमंत्र्यांनीही केलं कौतुक 

स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाचे प्राण वाचवणारा पराक्रम वीर म्हणून देशात ओळख झालेल्या मयूर शेळके या युवकावर देशातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. अगदी रेल्वेमंत्र्यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केलं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही फोनद्वारे मयूरच्या कामगिरीचं कौतुक केलं. तसेच, कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील सोमवारी मयुरची भेट घेऊन त्याला बक्षीस स्वरूपात धनादेशदेखील दिला. 

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक