तापमान मोजणी, हात धुणे, सॅनिटायझरसाठी सेन्सर आधारित तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 03:09 PM2020-07-26T15:09:03+5:302020-07-26T15:09:31+5:30

कोविड पडताळणीसाठी तंत्रज्ञानांचा वापर

Sensor based technology for temperature measurement, hand washing, sanitizer | तापमान मोजणी, हात धुणे, सॅनिटायझरसाठी सेन्सर आधारित तंत्रज्ञान

तापमान मोजणी, हात धुणे, सॅनिटायझरसाठी सेन्सर आधारित तंत्रज्ञान

Next
ठळक मुद्देफाईल निर्जंतुक करण्यासाठी यु. व्ही. तंत्रज्ञान; कंपन्या महापालिकेच्या विभाग कार्यालयाला देत आहेत अभ्यास भेटी

मुंबई : प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ इत्यादी परिसरांचा समावेश असणा-या महापालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयात सेन्सर आधारित स्वयंचलित थर्मामीटर, सेन्सर व टायमर आधारित कार्य करणारे हात धुण्याचे मशीन, याच पद्धतीने काम करणारे सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहेत. कार्यालयात येणारी प्रत्येक फाईल देखील प्रवेशद्वारावर असणा-या अल्ट्रा व्हायलेट किरणांनी (यु.व्ही रेज) निर्जंतूक केली जात आहे. प्रत्येक बेसीनचा नळ हा स्पर्शरहित पद्धतीने वापरता यावा, यासाठी या नळांना देखील सेन्सर बसविण्यात आले आहेत. कार्यालयातील शौचालयांमध्ये ऑटोमॅटिक सॅनिटायझर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर शौचालय स्वयंचलित पद्धतीने सॅनिटाईज होत आहेत. यापैकी बहुतांश यंत्रांचे डिझाईन व निर्मिती महापालिकेच्याच अभियंत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली आहे.

जी दक्षिण विभागाची लोकसंख्या ही सुमारे ३ लाख ८९ हजार इतकी आहे. या विभागाचे प्रशासकीय कार्यालय प्रभादेवी (पश्चिम) रेल्वेस्टेशन जवळील धनमिल नाक्याजवळ व ना.म.जोशी मार्गालगत आहे. याच विभाग कार्यालयाच्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभिनव उपयोग करुन कोविड विषयक विविध प्रतिबंधात्मक बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व बाबी प्रामुख्याने विभाग कार्यालयात कार्यरत असणाऱ्या महापालिका अभियंत्यांच्या कल्पक पुढाकाराने प्रत्यक्षात आल्या असल्याचेही सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी नमूद केले आहे. अभिनव प्रतिबंधात्मक उपाय योजना समजावून घेण्यासाठी गेल्या काही दिवसात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या, खासगी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाला अभ्यास भेटी दिल्या आहेत.

...........................

सुरक्षा चौकीलगतच्या भिंतीवर थर्मल स्कॅनर पद्धतीची तापमान मोजणी यंत्रे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बसविण्यात आली आहेत.
या भिंतीवरील यंत्रासमोर उभे राहणा-या व्यक्तीच्या शरीराचे तापमान स्वयंचलित पद्धतीने मोजले जात आहे.
तसेच हे तपमान निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्यास या यंत्रातून स्वयंचलितपणे सायरनचा (भोंगा) आवाज येतो.
ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताप असल्यास त्याची स्वयंचलित पद्धतीने पडताळणी होते.
ज्यानंतर सदर व्यक्तीला पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पाठविले जाते.

...........................

हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे.
यंत्राच्या खाली विशिष्ट अंतरावर हात नेल्यानंतर या यंत्रामधून सुमारे एक सेकंद एवढ्या कालावधीसाठी हॅण्डवॉश लिक्वीड हातावर येते.
त्यानंतर पाण्याचा फवाराही सुरु होतो. यामुळे कुठेही स्पर्श न करता व्यक्तीला त्याचे हात सुयोग्य प्रकारे धुता येतात.
या यंत्रामध्ये देखील थर्मल स्कॅनर बसविण्यात आले आहे.
ज्यामुळे हात धुणा-या व्यक्तीचे तापमान कळते.
अधिक तापमान असणा-या व्यक्तीबाबत वरीलप्रमाणेच सायरनचा आवाज येतो.

...........................

प्रवेशद्वाराजवळ यु. व्ही. रेजद्वारे (अतिनील किरणांद्वारे) निर्जंतुकीकरण करणारे यंत्र बसविण्यात आले आहे.
यंत्रामध्ये फाईल, संदर्भ पुस्तकं, रजिस्टर, नोंदवह्या, सॅक बॅग इत्यादी वस्तू ६० सेकंद एवढ्या कालावधीसाठी ठेवून निर्जंतूक करण्यात येत आहेत.
फाईल स्कॅनिंग साठी लवकरच आणखी एक अत्याधुनिक मशीन कार्यन्वित करण्यात येणार आहे.
विभाग कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रांच्या परिसराला 'स्क्रिनिंग झोन' असे नाव देण्यात आले आहे.

...........................

शौचालयांमध्ये स्वयंचलित सॅनिटायझेशन मशीन बसवण्यात आले आहे.
ठराविक कालावधीनंतर शौचालयांचे स्वयंचलित पद्धतीने सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
या अंतर्गत मशीनमध्ये पाच मिनिटांपासून तर दोन तासांपर्यंतचा कालावधी सेट करण्याची सुविधा आहे.

...........................

लिफ्टमध्ये हाताने दाबावयाचे परंपारिक पद्धतीचे बटण न ठेवता त्याऐवजी पायाने दाबावयाचे वैशिष्ट्यपूर्ण खटके यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.
लिफ्टच्या बाहेर देखील लिफ्ट बोलावण्यासाठी असणारी बटणे फूट ओपरेटेड पद्धतीचीच बसविण्यात आली आहेत.

Web Title: Sensor based technology for temperature measurement, hand washing, sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.