Join us

आईच्या निधनाचं दु:ख विसरण्यासाठी बाबांना सहलीला पाठवलं, पण अघटितच घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:04 AM

दीड वर्षापूर्वी आईचे निधन झाले. आईच्या निधनातून सावरावे, म्हणून बाबांना सहलीला पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. तेही आनंदी होते.

- मनीषा म्हात्रेमुंबई : दीड वर्षापूर्वी आईचे निधन झाले. आईच्या निधनातून सावरावे, म्हणून बाबांना सहलीला पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. तेही आनंदी होते. सहल संपवून ते लवकरच घरी परततील, म्हणून प्रतीक्षेत असताना, त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याचे हुबळी अपघातात मृत्यू झालेल्या रमेश जैतपाल यांच्या मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.घाटकोपरच्या परेरावाडी परिसरात रमेश जैतपाल (७०) हे दोन मुलांसोबत राहायचे. मुलगा संदेश याने दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर बाबा घरातच असायचे. नातवासोबत वेळ घालवायचे. त्याला शाळेत सोडायला जायचे. घाटकोपरचा ४० जणांचा ग्रुप कर्नाटकला निघाला. मात्र, सहलीच्या आदल्या दिवशीच एकाने काही कारणास्तव बेत रद्द केला. त्यामुळे बाबांना त्याच्या जागी जाण्याबाबत विचारणा केली. आईच्या धक्क्यातून थोडे सावरतील, म्हणून आम्हीही त्यांना जाण्यासाठी पुढाकार घेतला. तेही खूप आनंदात होते. शनिवारी सायंकाळी घरी येईन, असे त्यांनी फोनवरून सांगितले होते. मात्र, ते येण्यापूर्वी त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याचे संदेशने सांगितले.रमेश यांच्या निधनामुळेजैतपाल कुटुंबीयांना धक्का बसला आहे. धारवाड येथे झालेल्या अपघातात त्यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत.पुतणीच्या लग्नाआधीच काळाचा घाला...मित्र-परिवारांसोबत मजामस्ती करून पुतणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी केळुस्कर कुटुंबीय मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. हुबळी येथे झालेल्या अपघातात आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त लहू केळुस्कर (६५) आणि त्यांची मेहुणी सुमेधा जामसंडेकर यांचा मृत्यू झाला, तर पत्नी ललना जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ऐन लग्नमंडपात शोककळा पसरली.मूळचे देवगडमधील मिठबाव गावातील केळुस्कर कुटुंबीय. कांजूरमार्गच्या पालिका शाळेतून ते शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य शासनाच्या ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भांडुपच्या सूरज इमारतीत ते पत्नी ललना (६०) आणि दोन मुलांसोबत राहायचे. पत्नीही शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मुलगी इटलीला असते, तर त्यांचे बंधू जे. आर. हे पालिकेतून उप-शिक्षणाधिकारी म्हणून नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पत्नी, तसेच त्यांच्या मित्र-परिवारासोबत देवदर्शनाचा बेत आखला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर कर्नाटक दौरा ठरला. १८ला पुतणीचे लग्न असल्याने ते शनिवारी रात्री मुंबईत दाखल होणार होते आणि रविवारी ते पुतणीच्या लग्नाला हजेरी लावणार होते.ठरल्याप्रमाणे ७ दिवस धमाल-मस्ती करून केळुस्कर हुबळीवरून मुंबईकडे परतत असताना बसचा अपघात झाला. या अपघातात केळुस्करांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांची मेहुणी जामसंडेकर यांचाही मृत्यू झाला आणि लग्न मांडवात शोककळा पसरली. रविवारी ठाणे क्लबमध्ये पुतणीचा विवाह पार पडला.सोमवारी केळुस्करांची मुलगी इटलीहून परतताच, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.‘पुढच्या वर्षी तू पण ये’ म्हणाले होते...वडिलांचे विद्यार्थी असल्याने लहूसरांसोबत माझे घरचे संबंध. सहलीला जाण्यापूर्वी त्यांची भेट घेतली. सहलीबाबत घरात गप्पा सुरू होत्या. मलाही सोबत यायला आग्रह धरायचे. ‘या वर्षी नाही, तर पुढच्या वर्षी सोबत ये,’ असे त्यांनी सांगितल्याचे त्यांचे मित्र प्रमोद कांदळगाकर यांनी सांगितले.‘ते फोटो अखेरचे ठरले... आणि तोही’ ४० वर्षांची मैत्री. मनमिळावू, तसेच नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी लहूचा पुढाकार असे. पत्नी अमेरिकेत असल्याने मी एकटाच घरी असतो. अशात लहू माझा आधार ठरायचा. रोज एकमेकांशी गप्पा रंगायच्या. सहलीला जाण्यापासून तेथील मजामस्ती तो सांगत होता. अपघाताच्या पूर्वीच त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो मला पाठविले. स्वत:ची खुशाली कळविली. लवकरच भेटतो, म्हणाला. मीही वाट पाहतो, म्हणालो आणि ही वाट कायमची पाहायची असेल, असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, असे त्यांचे जीवलग मित्र डॉ. सूर्यकांत ऐरागी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.घटनाक्रम...घाटकोपर, भांडुपमधील ४० जणांचा ग्रुप ११ नोव्हेंबरला उद्यान एक्स्प्रेसने कर्नाटकला रवाना झाला. तेथे बाहुबली, कोस्टल परिसरात फिरले. १७ नोव्हेंबरला हुबळीवरून हम्पी मंदिराकडे जाणार होते. ४ तासांचा प्रवास होता. हम्पीकडून ते मुंबईकडे रवाना होणार होते. ठरल्याप्रमाणे पिकॉक रेस्टॉरंटमधून सकाळी पावणेपाच वाजता त्यांनी चेकआउट केले. मंदिराकडे जात असताना, साडेपाचच्या सुमारास धारवाडला पोहोचले. पुढे उभी गाडी दिसली, म्हणून उजवीकडून निघाले, तोच बस पलटी होऊन अपघात झाला. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी आहेत.शेतात शवविच्छेदन...अपघातानंतर जेसीबी बोलावून बस सरळ करण्यात आली. रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही. जखमींना अ‍ॅन्नीगेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. पुढे, शेतात मृतदेह ठेवून शवविच्छेदन करत मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आले.सहलीची आठवण अंगावर शहारे आणणारीवृद्धापकाळात आयुष्य मजा-मस्तीत आणि फिरण्यात घालविण्यासाठी त्यांनी सहलीचा बेत आखला. गेल्या सहा वर्षांपासून ते या सहलीचे आयोजन करीत आहेत. यामध्ये निवृत्त शिक्षक, मिल कामगार, तसेच नोकरदार कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यंदा पत्नी, सून, मुलगा आणि नातवंडासोबत सहलीला गेले. मात्र, झालेल्या अपघातामुळे या सहलीची आठवण अंगावर शहारा आणणारी ठरल्याचे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमीभांडुपच्या शिवराम पार्क येथे सुचित्रा राऊळ (६५) राहण्यास होत्या. त्या अहिल्याबाई शाळेतून निवृत्त झाल्या असून, पतीसह या सहलीत सहभागी झाल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे.

काच तोडून त्याने अनेकांना वाचविलेघाटकोपरच्या म्हात्रे कुटुंबीयांकडून दरवर्षी या सहलीचे आयोजन केले जाते. अमोल म्हात्रे हादेखील वडील विश्वनाथ (७४), चुलते दिनकर (७०), आई, पत्नी आणि मुलीसोबत या सहलीत सहभागी झाला होता. अखेरचे दर्शन घेत, ते मुंबईला रवाना होणार होते. त्यापूर्वीच बस उलटली. अशा वेळी अमोलने काचा तोडून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. मात्र, यात त्याचे वडील विश्वनाथ आणि चुलते दिनकर यांचा मृत्यू झाला. चुलते दिनकर यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याने, त्यांचा अमृत महोत्सव साजरा करत, सगळे जण या सहलीत सहभागी झाले होते. या घटनेमुळे म्हात्रे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :अपघात