कोर्टात धिंगाणा घालणाऱ्या वकिलाची तुरुंगात रवानगी; घटनेनंतर १३ वर्षांनी झाली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:59 AM2018-09-03T01:59:45+5:302018-09-03T01:59:57+5:30
आरोपी असलेल्या आपल्या अशिलास बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरविल्यानंतर आरडाओरडा करून न्यायालयात धिंगाणा घालणा-या आणि आरोपीविरुद्ध शिक्षेचा आदेश न देण्याबद्दल न्यायाधीशास धमकावणा-या रामचंद्र किसनराव कागणे या ६७ वर्षांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.
मुंबई: आरोपी असलेल्या आपल्या अशिलास बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरविल्यानंतर आरडाओरडा करून न्यायालयात धिंगाणा घालणा-या आणि आरोपीविरुद्ध शिक्षेचा आदेश न देण्याबद्दल न्यायाधीशास धमकावणा-या रामचंद्र किसनराव कागणे या ६७ वर्षांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे.
परभणी जिल्हा न्यायालयात वकिली करणाºया या वकिलास फौजदारी स्वरूपाच्या न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) दोषी ठरवून न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने एक आठवड्याची
साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास कागणे यास आणखी दोन दिवस तुरुंगात राहावे लागेल. गेल्या शुक्रवारी हा निकाल होताच न्यायालयात हजर असलेल्या व जामिनावर असलेल्या कागणेना लगेच ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
अॅड. कागणे हे गंगाखेड तालुक्यातील कागणेवाडीचे रहिवासी असून गेली ३० वर्षे परभणी जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करत आहेत. परभणीचे त्यावेळचे हंगामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशेक गोविंदराव बिलोलीकर यांनी कागणे वकिलांविरुद्धचे हे कन्टेम्प्टचे प्रकरण सन २००६ मध्ये उच्च न्यायालयाकडे पाठविले होते. त्याचा आता १२ वर्षांनी निकाल लागला.
कागणे यानी घडलेल्या घटनेचा जराही इन्कार केला नाही. उलट न्यायाधीशांनी प्रस्थापित न्यायालयीन प्रक्रियांचा भंग केल्याने आपण आपल्या अशिलाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे वर्तन केले, असा त्याचा बचाव होता.
तो अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, वकिलानेच न्यायालयात असे वर्तन करणे कोणत्याही सबबीखाली क्षम्य नाही. न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नसेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचे अन्य वैध मार्ग आहेत.
स्टेनोची वही भिरकावली
न्यायाधीश बिलोलीकर यांनी ७ आॅक्टोबर २००५ रोजी कागणे यांच्या अशिलास बलात्काराबद्दल दोषी ठरविले. शिक्षेविषयी आरोपीचे म्हणणे ते ऐकून घेत असताना कागणे एकदम आरडा-ओरडा करू लागले. ते न्यायासनाकडे धावत गेले व स्टेनोची शॉटॅहँडची वही हिसकावून त्यांनी ती भिरकावली. ती पब्लिक प्रॉसिक्युटरच्या डोक्यावर आदळली. कोर्टाच्या शिपायाने ती वही उचलून स्टेनोला दिली. पण कागणे यांनी ती हिसकावून घेत पुन्हा भिरकावून दिली. ‘कोर्ट निकाल कसे देते तेच पाहतो. कोर्टाची दादागिरी चालू देणार नाही. इडियट मॅजिस्ट्रेट’, असे रागाने ओरडत त्याने न्यायाधीश बिलोलीकर यांना धमकावले.