अंबानींच्या निवासस्थानाजवळील स्फोटकांनी भरलेले कार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटीलिया बंगल्याच्या परिसरात सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्काॅर्पिओ कारमागील गूढ उलगडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गुन्हा अन्वेषण विभागाबरोबरच दहशतवादविरोधी पथक व राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून याबाबत समांतर तपास करण्यात येत आहे, ते स्वतंत्रपणे घटनास्थळी पडताळणी व संबंधितांचा जाबजबाब नाेंदवण्यात गुंतले आहेत.
हा घातपाताचा प्रयत्न होता की, घाबरविण्यासाठी मुद्दामहून घडवून आणलेला कट होता, याबद्दल लवकरच उलगडा करू, असे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंबानींच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी दुपारी बेवारस अवस्थेत सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या, धमकीचे पत्र आणि ४ गाडीच्या नंबरप्लेट हाेत्या. कार चोरीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित मालकाकडे कसून चौकशी करण्यात आली. शनिवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. धमकीच्या पत्राबाबतही कसून चौकशी करण्यात येत आहे. सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
...............