Join us

कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली पर्यटनातून विकासासाठी ही प्रयत्न करणार: दीपक केसरकर

By सीमा महांगडे | Published: October 20, 2023 6:30 PM

कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक ही झाली असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी पालिका व शासन दोघे सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुंबईत ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून कोळीवाडे आणि गावठाण्यात वास्तव्यास असलेले नागरिक मूळ रहिवासी आहेत. हे कोळीवाडे म्हणजे जुन्या मुंबईची ओळख आहे. या कोळीवाड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. कोळीवाड्यांची, तेथील घरांची विशिष्ट रचना असते, त्यांची खास संस्कृती आहे. कोळीवाड्यांचे एक खास सौंदर्य आहे. हे सौंदर्य, ओळख टिकवून ठेवून हा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) तयार करण्याची गरज आहे. या कोळीवाड्यांचे अस्तित्व, सौंदर्य, परंपरा आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करता येते का याची आम्ही चाचपणी करत असल्याची माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक ही झाली असल्याचे ही त्यांनी नमूद केले.कोळीवाड्यांच्या पुनर्विकासा अभावी तेथील विकासाचा खोळंबा खोळंबा झाला असून त्‍यांना आपल्‍या राहत्‍या घराची दुरूस्‍ती व डागडूजी करतानाही अडचणी येतात. त्यामुळे मूळ मुंबईकरांच्‍या पुनर्विकासासाठी स्‍वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी तसेच त्‍यांना अतिरिक्‍त एफएसआय देण्‍यात यावा, कोळवाडे आणि गावठाणांचे सिमांकन करण्‍यात यावे अशा सूचना आल्या आहेत.  इमारतींचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा असल्‍यामुळे विकास करताना अडचणी येतात त्यामुळे या इमारतींसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी असे मत व्यक्त केले जात आहे. स्वतंत्र   विकास नियंत्रण नियमावलीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली. या शिवाय कोळीवाड्यात राहणाऱ्यांना सोयी-सुविधाही देता येतील, या दृष्टीने ही नियमावली परिपूर्ण असेल, असेही  त्यांनी सांगितले.कोळीवाड्यांचा पर्यटनातून विकास

येत्या सोमवारपासून मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना संबंधित अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन आढावा घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोळीवाडे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तिथेच खान पानाची व निवासाचीही सुविधा मिळू शकेल, अशीही माहिती त्यांनी दिली. महानगरपालिकेकडून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाड्यात उपक्रम राबवला जाणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :दीपक केसरकर