मुंबई : मुंबईतील सर्व उद्यानांमध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश दिले जातील. तसेच सर्व उद्यानांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यास मुंबई महापालिका आयुक्तांना सांगितले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. उद्यानांच्या प्रश्नांवर संबंधित आमदारांची बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुंबईमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यानुसार काम सुरू झाले आहे. उद्यानांमध्ये स्वच्छतागृह, लाईट आणि इतर सुविधा असणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची सूचना आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराच्या रस्त्यावर प्रत्येकी १० स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
भाजपच्या भारती लव्हेकर यांनी मुंबई महापालिका क्षेत्रांमधील सर्वच उद्याने, स्वच्छतागृह, पाणपोई आणि दिव्यांची सोय नसल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. लव्हेकर, नाना पटोले, आशिष शेलार, अमिन पटेल, योगेश सागर यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात दिलेल्या लेखी उत्तरावर हस्तक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर ट्रायडंट हॉटेल ते नरिमन पाईंट येथील उड्डाणपुलाच्या मार्गावर फक्त एकच स्वच्छतागृह असल्याकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्ष वेधले. या मार्गावर स्वच्छतागृह उभारले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खड्डेमुक्त मुंबईशिंदे यांनी या निमित्ताने ठाकरे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गेली पंधरा वीस वर्षे जे झाले नाही, ते आम्ही सुरू केले आहे. मुंबई बदलतेय, सुंदर होतेय. मुंबईकरांनी अनेक वर्षे खड्ड्यांतून प्रवास केला. आता आम्ही मात्र खड्डेमुक्त मुंबई करायला निघालो आहे.