CoronaVirus News: मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची 'हीच ती वेळ'; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:16 PM2020-05-14T12:16:52+5:302020-05-14T12:20:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.
मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे स्वागत करताना देशाला एवढ्या मोठ्या पॅकेजची गरज होती, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. तसेच मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांच्या मागणीनंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मुंबईतील उद्योग,आरोग्य,कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ असल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे ,देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे.मुंबईतील उद्योग,आरोग्य,कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2020
नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. यानंतर बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच आज पुन्हा निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?
पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी
...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर