कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात प्रत्येकी १० लाखांचा स्वतंत्र निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:10 PM2020-04-25T17:10:37+5:302020-04-25T17:11:10+5:30
कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील ग्रामीण भागात विशेष काळजी घेण्यात येत असून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.
मुंबई : भारत सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यातील ग्रामीण भागात विशेष काळजी घेण्यात येत असून मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे .त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येत आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
कोविड -19 विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात सर्वांना विशेषतः विलगीकरण केंद्र, रुग्णालये, दलित वस्ती ,झोपडपट्टी, वृद्धाश्रम इत्यादींना मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा कसा होईल यादृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून त्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींची निवड करताना ज्या जिल्ह्यात कोविड -19 या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती, प्रादुर्भाव झालेल्या शहरी ठिकाणांच्या शेजारील ग्रामपंचायती,जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केलेल्या ग्रामपंचायती अशा ग्रामपंचायतींची निवड करावी .पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक रसायनांचा (ब्लिचिंग पावडर, सोडियम क्लोराइड, क्लोरीन टेबलेट्स) वापर केल्यानंतरच पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच ठराविक कालावधीनंतर पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात यावी .त्यासाठी आवश्यक प्रमाणात रसायने तसेच जैविक पाणी गुणवत्ता चाचणी संच यांचा मुबलक पुरवठा असेल याची खात्री करावी. या प्रक्रियेत अडथळा येणार नाही या दृष्टीने आवश्यकतेप्रमाणे रसायने तसेच पाणी गुणवत्ता चाचणी संचाची खरेदी करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत .पाणीपुरवठ्याची संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनीटायझर यांचा पुरवठा करावा अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत अशी माहितीही मंत्री त्यांनी दिली.