Join us  

दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 9:36 AM

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.   

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. 

राज्यात बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर घरेलु कामगार यांच्यासाठी मंडळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतमजुरांसाठी योजना करण्याबाबतच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.   

चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक केला जात आहे. त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी एकनाथ शिंदेंनी बैठकीतूनच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी संवाद साधला आणि या कामाला वन विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळण्याची मागणी केली. या बैठकीत अचलपूर जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, माधान ता. चांदूरबाजार येथे शासकीय सिट्रस इस्टेट करणे, फीन ले मील पुर्ववत सुरू करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी संबंधित विभागांना दिल्या.

टॅग्स :एकनाथ शिंदेबच्चू कडूमहाराष्ट्र सरकार