मुंबई आयआयटीच्या कँटीनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:13 PM2023-09-30T13:13:20+5:302023-09-30T13:13:35+5:30
बसण्याच्या जागेवरून वाद, पुन्हा मोठा वाद पेटण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही महिन्यांपूर्वी आयआयटी मुंबईच्या कँटीनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता आयआयटी प्रशासनाने शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कँटीनमध्ये स्वतंत्र टेबल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
आयआयटीच्या वसतिगृह १२ च्या कँटीनमध्ये जुलै महिन्यात मांसाहारीविरुद्ध शाकाहारी असा वाद निर्माण झाला होता. येथे फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे, अशा आशयाची भित्तिपत्रके कँटीनमध्ये लावण्यात आली होती. या भित्तिपत्रकाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
आता मेस काउन्सिलने वसतिगृह १२, १३ आणि १४च्या विद्यार्थ्यांना मेल पाठविला असून या तीनही वसतिगृहांच्या कँटीनमध्ये सहा टेबल फक्त शाकाहारींसाठी असून या नियमाचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करून दंड आकारला जाईल, असे त्यात सूचित केले आहे.
आयआयटीच्या कॉमन कँटीनमध्ये ८० ते १०० टेबल असून त्यापैकी सहा टेबल शाकाहारी व्यक्तींसाठी राखीव असतील. एका टेबलवर प्रत्येकी आठ जण बसू शकतात. शाकाहारींच्या टेबलवर विशेष खुणा असतील.
कौन्सिलकडून स्पष्टीकरण
कँटीनमध्ये जेवताना मांसाहारी भोजन पाहून किंवा त्याचा वास काही जणांना सहन होत नाही. त्यामुळे संबंधितांना प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे कँटीनमध्ये शाकाहारी असणाऱ्यांसाठी सहा वेगळे टेबल्स असणे ही गरजेची गोष्ट आहे, असे विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये मेस कौन्सिलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर यांचा समावेश आहे.