मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातून वाहणाऱ्या मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहीसर या नद्यांच्या संवर्धनासाठी पुरेशा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली नाहीत. जी कामे करण्यात आली त्या कामांनी नद्या पुनरुज्जीवित होण्याऐवजी मरणपंथाला लागल्या. नद्यांमधून पाणी वाहण्याऐवजी सांडपाणी, रसायनयुक्त पाणी वाहू लागले. कचरा वाहू लागला. पुन्हा यावर उपाय म्हणून भलेमोठे प्रकल्प हाती घेतले गेले. कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत काहीच हालचाल झाली नाही. मुंबईतल्या नद्यांचे नाले झाल्याची टीका पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या नागरिकांनी केली आहे.
------------------------
- मुंबईच्या नद्या काँक्रिटीकरणाच्या अधीन आहेत.
- नैसर्गिक पूर निचरा कमी होत आहे.
- सांडपाणी थेट नदीच्या प्रवाहात सोडले जात आहे.
- मिठीच्या मूळ पूरक्षेत्रातील ५४ टक्के भागावर अतिक्रमण आणि काँक्रिटीकरण आहे.
- प्लास्टिक आणि औद्योगिक कचऱ्यामुळे नद्या गुदमरल्या आहेत.
------------------------
काय आहे योजना
जलप्रवाहांवरील ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या अशा नऊ ठिकाणी तरंगता कचरा अडविण्यासाठीची यंत्रणा (फ्लोटिंग डेब्रिस-ट्रॅपिंग ट्रॅश बूम्स) तैनात करण्याची योजना आहे. यामध्ये दहीसर, ओशिवरा आणि पोयसर नदी तसेच महत्त्वाच्या नाल्यांचा समावेश आहे.
------------------------
देशातील पहिलाच प्रकल्प
मिठी नदी स्वच्छता या पथदर्शी उपक्रमांतर्गत नदीपात्रात वाहणारा जास्तीत जास्त कचरा जमा करून त्याचे पुनर्चक्रीकरण केले जात आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. फिनलॅण्डच्या रिव्हररिसायकल यांनी विकसित केलेले विशेष यंत्र वापरण्यात येत आहे. ज्याद्वारे नदी स्वच्छ करण्यासाठी तरंगणारा प्लास्टिकचा कचरा जमा करून त्याचे पुनर्चक्रीकरण केले जात आहे.
------------------------
क्षेत्र लुप्त
गेल्या ३० वर्षात सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलामुळे मुंबई महानगर परिसरातील एकूण १०७.६ चौ. किमी एवढे नदी, नाले आणि शेतजमीन युक्त असलेले क्षेत्र (संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा १०३ चौ. किमी थोडे जास्त क्षेत्र) हे नैसर्गिकरीत्या लुप्त झाले आहे. त्याचे रूपांतरण गाळयुक्त दलदल किंवा कांदळवनात / खारफुटी वृक्षराजीत झाले आहे.
------------------------
- कुर्ला आणि कलिना येथे भंगारचा कचरा मिठी नदीमध्ये जातो आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे.
- पूर नियंत्रण रेषेमध्ये असलेल्या बांधकामांकडे कोणाचेच लक्ष नाही.
- मुळातच कचरा मिठीमध्ये टाकला जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
- चारही नद्यांवर स्वच्छता प्रकल्प हाती घेतले पाहिजेत.
- मलजल मिठी नदीत जाणार नाही यासाठी काम केले पाहिजे.
- नद्यांची खोली वाढविल्याने पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढल्याने नद्यांना पूर आला तरी पुराचे पाणी पसरून त्यामुळे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होईल.
------------------------