जुहूमध्ये सशस्त्र दरोडा घालणारी सराईत टोळी गजाआड
By admin | Published: August 18, 2015 02:00 AM2015-08-18T02:00:00+5:302015-08-18T02:00:00+5:30
कोणताही पुरावा नसताना सशस्त्र दरोडा घालून बंगला लुटणारी उस्मानाबादेतील सराईत टोळी जुहू पोलिसांनी शिताफीने गजाआड केली. यासाठी तब्बल आठवडाभर जुहू
मुंबई : कोणताही पुरावा नसताना सशस्त्र दरोडा घालून बंगला लुटणारी उस्मानाबादेतील सराईत टोळी जुहू पोलिसांनी शिताफीने गजाआड केली. यासाठी तब्बल आठवडाभर जुहू पोलीस ठाण्याचे पथक वेशांतर करून उस्मानाबादेतील मोहा गावात ठाण मांडून होते. ३१ जुलैला गांधीग्राम लेनवरील जय माता कुटीर बंगल्यात सशस्त्र दरोडा पडला होता. अंगात काळे बनीयन, काळी हाफ पॅन्ट, डोक्यात मंकी कॅप घातलेले आणि हातात कोयता, सुरे अशी घातक हत्यारे घेतलेले दरोडेखोर बंगल्यात शिरले. बंगल्याचे मालक हरिश्चंद्र मिश्रा यांच्यासह पाच नोकरांचे हातपाय बांधले. त्यांच्यावर हत्यारांचे वार केले.
पुढे बंगल्यातून मोबाइल, रोकड असा एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले. हा
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने परिमंडळ ९चे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी जुहू पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.
दरोडेखोर हुशार होते. जाताना त्यांनी बंगल्यातील सीसीटीव्हींचे चित्रण कैद होणारे डीव्हीआर
मशिनही घेऊन गेले. त्यामुळे एकही क्ल्यू हाताशी नव्हता. मात्र दरोडा घालताना एकमेकांशी संवाद साधताना दरोडेखोरांनी वापरलेली विशिष्ट भाषा, गुन्ह्याची पद्धत
आणि खबऱ्यांचे भक्कम जाळे या जोरावर निरीक्षक पंडित ठाकरे, एपीआय विलास देशपांडे, फौजदार श्रीनिवास चेवले आणि पथकाने उस्मानाबाद व मुंबईतून सहा आरोपी गजाआड केले, असे सत्यनारायण यांनी सांगितले.
शरद काळे, दादया काळे, सुनील शिंदे, अंबादास शिंदे, प्रकाश पाटील आणि श्रवण दास
अशी अटक आरोपींची नावे
आहेत. यापैकी पाटील व दास हे मुंबईतले असून उर्वरित सर्व उस्मानाबादच्या मोहा, मांडवा गावचे रहिवासी आहेत.
नोकरच होता मास्टरमाइंड
मुंबई : जुहूतल्या बंगल्यात दरोडा घालण्याची कल्पना चार वर्षांपासून तिथे नोकरी करणाऱ्या श्रवण दास याला सूचली. त्यानेच काळे बंधूंना कल्पना सांगितली व कट आखला. प्रत्यक्ष दरोडयातही मालकासोबत असूनही दासने दरोडेखोरांना महत्वाचे सहकार्य केले, अशी माहिती जुहू पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
पोलिसांनुसार बंगल्याचे मालक मिश्रा यांचे दोन कुत्रे होते. श्रवण या कुत्र्यांचा हॅण्डलर म्हणून काम करत होता. सकाळ-संध्याकाळ कुत्र्यांना फिरवण्यासाठी श्रवण जुहू किनाऱ्यावर जाई. २४ जुलैला त्याची भेट काळे बंधुंशी झाली. छोटयाशा भेटीत तिघांचे सूर जुळले. दासने मनातली कल्पना काळे बंधुंना सांगितली. लगोलग दरोडयाचा कट आखला गेला. बंगल्यात खुप रोकड असल्याची माहिती दासला होती. त्याने तीही काळेंना सांगितली. त्यानुसार काळे बंधुंनी उस्मानाबादेतून आपल्या अन्य सहकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले. प्रत्यक्षात दरोडेखोर आत शिरले तेव्हा संशय येऊ नये म्हणून मालक मिश्रा, अन्य नोकरांसह दासचेही हातपाय बांधले. मात्र त्याला मारहाण केली नाही. तपासात बंगल्यातील अनेक कपाटे सोडून दरोडेखोरांनी नेमकीच कपाटे कशी फोडली, सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुठे असतो हे दरोडेखोरांना नेमके कसे ठाऊक यावरून बंगल्यातील कोणीतरी दरोडेखोरांना मिळालेला आहे, हा जुहू पोलिसांचा निष्कर्ष खरा ठरला. त्यांनी दासकडे कसून चौकशी केली. मात्र त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्याने सांगितलेला प्रसंग व मालकनोकरांनी सांगितलेला प्रसंग यात तफावत आढळली. तसेच दासकडे सापडलेल्या मोबाईलमध्ये आल्या-गेलेल्या फोनकॉलवने पोलिसांना तपासाची दिशा दिली.
(प्रतिनिधी)