मुंबईतील गूढचित्रांची मालिका सुरूच, शिवाजी पार्कात आढळले नवीन गूढ चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:11 AM2018-05-17T00:11:57+5:302018-05-17T00:11:57+5:30
मुंबईच्या रस्त्यांवरील आढळलेल्या विशिष्ट प्रकारच्या चित्रांचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. त्यात आता एका चित्राची अजून भर पडलीय. दादरच्या शिवाजी पार्कातील समर्थ व्यायाम मंदिराच्या इमारतीवरील भिंतीवर हे गूढ चित्रं रेखाटण्यात आलं आहे.
- अजय परचुरे
मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील आढळलेल्या विशिष्ट प्रकारच्या चित्रांचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. त्यात आता एका चित्राची अजून भर पडलीय. दादरच्या शिवाजी पार्कातील समर्थ व्यायाम मंदिराच्या इमारतीवरील भिंतीवर हे गूढ चित्रं रेखाटण्यात आलं आहे. शिवाजी पार्कात मोक्याच्या ठिकाणी हे चित्र आढळल्याने सध्या हे चित्र पाहण्यासाठी समर्थ व्यायाम मंदिराच्या इमारतीपाशी बघ्यांची गर्दी जमत आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील काही भिंतीवर मार्च महिन्यात ही गूढ चित्रे दिसायला लागली होती. सोशल मिडियावर ही चित्रे प्रदर्शित झाल्यावर याविषयीची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती. त्रिकोणासारखी आकृती व त्याखाली नागमोडी वळणाची रेषा अशा प्रकारची चित्रे मुंबईतील माहीम भागात प्रसिद्ध असणार्या व्हिक्टोरिया चर्चच्या भिंतीवर आणि दादरमधील मोक्याच्या ठिकाणी असणार्या शिवसेना भवनच्या अगदी समोर असणार्या कोेहिनूर स्क्वेअरच्या इमारतीवरील भिंतीवर याआधी आढाळली होती. मुळात ही चित्रे बँक्सी नावाच्या ब्रिटिश चित्रकाराने काढलेल्या चित्रांशी मिळतीजुळती आहेत. पण मग ही चित्रे नेमकी काढतेय तरी कोण? याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची माहिती कोणालाही मिळू शकलेली नाही. त्यातच बरोबर महिन्याभराने हे गूढ चित्र पुन्हा एकदा आढळून आल्याने पुन्हा एकदा सोशल मिडियावर या चित्रांविषयी चर्चा सुरू झाली आहे. शिवाजी पार्क हा तसा मुंबईतील गजबजलेला परिसर आहे. सकाळच्या वेळेत जॉगिंग करायला येणार्यांची संख्याही खूप असते.दोन दिवसापासून हे अनोखे गूढ चित्र पाहण्यासाठी या परिसरात गर्दी होतेय. अश्या प्रकारचे गूढ चित्र काढण्यामागचा चित्रकाराचा नेमका हेतू काय असू शकतो ? याविषयी शिवाजी पार्क परिसरात जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत. चौकट ब्रिटिश चित्रकार बँक्सीची चित्रे ही राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर मते मांडण्यासाठी तेथील रस्त्यांवरील भिंतींवर चितारण्यात येतात. बँक्सीची ही जगप्रसिद्ध चित्रे जगातील अनेक शहरांतील रस्त्यांवर, पुलांवर आणि मोक्याच्या ठिकाणी चितारण्यात आली आहेत. पण मुंबईतील या गूढ चित्रांचा खरा चित्रकार कोण याचे कोडे अजूनही सुटत नाहीयेत. ृ