एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिले असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यावे असे काय आहे, असा सवाल करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रावर बोलण्यास नकार दिला. मात्र, ते पत्रं जर खरे असेल तर त्यात एक मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देत आहे? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.
................................
संजय राऊत यांनी पत्रातील एकच पॅरा वाचला - प्रवीण दरेकर, विराेधी पक्षनेते
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीत काय चालले आहे, हे दाखविणारे हे पत्र आहे. शिवसेना आमदारांची अस्वस्थता, तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी यामधून स्पष्ट दिसते. परंतु, संजय राऊत यांना आपल्या पक्षातील आमदाराच्या, शिवसैनिकांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यांनी फक्त केंद्रीय यंत्रणांबाबतचा एकच परिच्छेद वाचला, यापेक्षा शिवसेनेचे दुसरे दुर्दैव असू शकत नाही. पत्र राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नाराजी संदर्भात आहे. मग संजय राऊत शिवसेनेची काळजी घेतात की राष्ट्रवादीची काळजी घेतात, हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण माहिती आहे. शिवसेनेचे बदललेले स्वरूप संजय राऊत यांच्या माध्यमातून पुन्हा अधोरखित झाले आहे.
...........................................................................
उद्धव ठाकरे यांनी युती करण्याचा विचार करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रात अडकले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवे. भाजपसोबत युती करण्याच्या प्रताप सरनाईक यांच्या सूचनेचा मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.
........................................