लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येत आहे. याआधी होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा होता. आता हा कालावधी १७ दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे व खाटा मिळण्यास काहीवेळा विलंब होत असल्याने रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येते. नियमित औषध व खबरदारी न घेतल्यामुळे काही रुग्ण गंभीर होण्याचे प्रकारही वाढले आहेत. महापालिकेने खाटांची संख्या टप्याटप्याने वाढवणे सुरू ठेवले आहे. मात्र अतिदक्षता विभागातील खाटा आणि व्हेंटिलेटरवर खाटांची प्रचंड कमतरता भासत आहे. लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी महापालिकेने पंचतारांकित हॉटेलमध्ये खाटा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी दररोजचे शुल्क चार हजार रुपये असणार आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांना खाटा न मिळाल्यास घरातच उपचार घ्यावे लागत आहेत. उपचार न घेतल्यास त्यांची प्रकृती खालाविण्याचा धोका असतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणत्या रुग्णाला खाटांची गरज आहे, याचे निदान होते. सर्वच रुग्णांना रुग्णालयात खाटा देण्याची आवश्यकता नसते. त्यांची तपासणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार कोरोना काळजी केंद्र १ आणि २ येथे दाखल करण्यात येत आहे. गरज नसेल तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गृह विलगीकरणात ठेवले जाते.- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्णमार्च २०२० पासून आतापर्यंत मुंबईतील ५५ लाख ३६ हजार ४१६ लोकांनी होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. जानेवारी अखेरीस जेमतेम ७० हजार रुग्ण होम क्वारंटाइन होते. मात्र आता हीच संख्या सहा लाख ३४ हजार २२० वर पोहोचली आहे.
गृह विलगीकरणाची कारणे काय?कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर महापालिकेने बहुतांशी कोविड केंद्रे बंद केली. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. त्या तुलनेत खाटा कमी पडू लागल्या. त्यातच लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागल्याने गंभीर रुग्णांना खाटा मिळेनाशा झाल्या. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज असलेल्या बाधित रुग्णांना खाटा दिल्या जात आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागत आहेत.
असे आहेत नियम...रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. मात्र यापैकी किती रुग्ण गंभीर होऊन मृत्यू पावले याची आकडेवारी महापालिकेकडे नाही.