बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगलीचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहकार्याने इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्च (आयसीएमआर)च्या वतीने राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये चौथा सेरो सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे. या शेवटच्या सर्वेक्षणात सुमारे तीन हजार नमुने घेण्यात येणार असून, या विषाणूचा किती परिणाम झाला आहे, हे यातून कळेल. राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना संसर्ग झाला आहे.
कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी व्यक्तीच्या शरीरात अँटी-बॉडीज तयार होतात. सेरो सर्वेक्षणात या विषाणूचा विस्तार किती प्रमाणात झाला, याचा शोध लावला जातो. चौथ्या सेरो सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी व राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, सेरो सर्वेक्षणात सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यात बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर आणि सांगलीचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ४०० नमुने घेतले जातील. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयात कार्यरत १०० आरोग्यसेवा कामगारांचे नमुनेही तपासणीसाठी घेतले जातील. एकूण ३ हजार नमुन्यांची चाचणी केली जाईल.
* ७२० मुलांचे घेणार नमुने
संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात, तज्ज्ञांनी मांडलेल्या मतानुसार, मुलांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे ६ ते १८ वर्षांच्या मुलांना चौथ्या सेरो सर्वेक्षणात समाविष्ट केले आहे. या सेरो सर्वेक्षणात सहा जिल्ह्यांतील ७२० मुलांचे नमुने घेण्यात येणार आहेत. यातून हे कळेल, की राज्यातील किती मुलांना या विषाणूचा संसर्ग झाला.
* सेरो सर्वेक्षण म्हणजे काय?
- काेराेना विषाणू संक्रमणाच्या अभ्यासासाठी रक्ताचे नमुने घेऊन तयार करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला सेराे सर्वेक्षण म्हणतात. कोरोना महामारी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन आहे. याविषयी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना कोणतीही माहिती नाही. म्हणूनच, साथीच्या रोगाशी संबंधित मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते, जेणेकरून भविष्यात रोगाशी लढा देण्याचे धोरण तयार केले जाऊ शकते.
- सेरो सर्वेक्षणाद्वारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. तयार झालेल्या अँटी-बॉडीज लोकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी भिंत म्हणून कार्य करतात. याला हर्ड इम्युनिटी असे म्हणतात. सेरो सर्वेक्षणामुळे याचा शोध घेण्यास मदत होते.
- तज्ज्ञांच्या मते, जेव्हा ६० ते ७० टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिपिंड (अँटी-बॉडीज) विकसित होतात, तेव्हा हर्ड इम्युनिटी तयार होते. देशातील कोणत्या भागात आणि कोणत्या वयातील लोकांना जास्त संसर्ग होतो? किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि संक्रमित लोकांमध्ये अँटी-बॉडीज किती काळ राहतील, हे या सेरो सर्वेक्षणातून स्पष्ट होते.
----------------------------
.................