नोकरानेच पळवली मालकाची ५० लाखांची रोकड; मुंबईच्या डोंगरी परिसरातील घटना, गुन्हा दाखल
By मनीषा म्हात्रे | Published: September 24, 2022 09:42 PM2022-09-24T21:42:00+5:302022-09-24T21:42:40+5:30
नोकरानेच मालकाची ५० लाखांची रोकड पळवल्याची घटना डोंगरीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोकरानेच मालकाची ५० लाखांची रोकड पळवल्याची घटना डोंगरीत घडली. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
ताडदेव येथील रहिवासी असलेले कुणाल मांगीलाल बाफना (३७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनाच स्टेशनरी विक्रीचा व्यवसाय आहे. दुकानदारांना त्यांच्या मागणीनुसार, स्टेशनरीच्या वस्तू पुरवतात. ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत दुकानातील मालाची विक्री झालेली एकूण रक्कम ५१ लाख अंदाजे अशी वेगवेगळ्या दुकानदारांकडुन मित्र इमरान यांचेकडे जमा झाली होती.
२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दुकानातील सेल्समन विक्रम कुमार, मालमसिंग राठोड या दोघांना मित्र इमरान सय्यद यांचेकडुन ५० लाख आणण्याकरीता त्याच्या राहत्या घरी पाठवले. दुकानात कामासाठी वापरण्यात असलेली दुचाकी घेऊन ते गेले. मात्र बराच वेळ उलटूनही ते न परतल्याने त्यांना संशय आला. राठोडचा फोनही बंद लागला. त्यानंतर, त्यांनी विक्रम कुमारकडे चौकशी करताच सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास इमारतीजवळ पैसे घेऊन पोहचताच पैशांची बॅग मालसिंगकडे होती. तो बॅग देण्यासाठी खाली उतरताच आपण घरी निघून आल्याचे सांगितले. त्यामुळे राठोडनेच रोकड पळविल्याची खात्री पटताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करत आहे.