नोकरच निघाला ‘त्या’ वृद्धेचा मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 02:04 AM2021-03-02T02:04:17+5:302021-03-02T02:04:22+5:30
दोन दिवसांत पोलिसांनी लावला छडा, दोन आरोपींना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरात काम करणाऱ्या नोकरानेच ७७ वर्षीय वृद्धेची लुटीच्या उद्देशाने हत्या केल्याचे वरळी पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. कुठलाही पुरावा हाती नसताना वरळी पोलिसांनी ४८ तासांत आरोपी दुकलीला अटक केली. नोकर अमरजीत करमराज निशाद (२२) आणि अभिजीत रामपलट जोरिया (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरळी सी फेस परिसरात राहणाऱ्या ७७ वर्षीय विश्वी डोलवानी यांच्याकडे अमरजीत मागील तीन महिन्यांपासून घरकाम करत हाेता. घरातील सर्व माहिती त्याला होती. घरातील पैसा बघून त्याची नियत फिरली. बंगल्याच्या तळमजल्यावर विश्वी एकट्याच राहात होत्या, तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे राहात आहेत.
विश्वी यांच्या सेवेसाठी ठेवलेली महिला काही कामानिमित्त गावी गेली हाेती. हीच संधी साधून अमरजीतने गुरुवारी रात्री मित्राच्या मदतीने घरात चोरीचा कट आखला. त्याने चोरी करण्यापूर्वी विश्वी यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यांच्याच ओढणीने त्यांचे तोंड बांधले. घरातील ऐवज लुटून साथीदार अभिजीतसह ताे पसार झाला. त्याने विश्वी यांच्या तोंडात कापडाचा बोळा घातल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरील सीसीटीव्हीही बंद होते. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर होते. घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून अमरजीतही नॉट रिचेबल झाला. वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हाच धागा पकडून तपास सुरू केला आणि अवघ्या ४८ तासांत अमरजीतसह त्याच्या साथीदाराला अटक केली. चोरीला गेलेली सर्व मालमत्ता त्यांच्याकड़ून जप्त करण्यात आली.