मुंबई: व्यावसायिकाचे ७२ लाख ९० हजार रुपये किंमतीचे एक किलो १२५ ग्रॅम सोने घेऊन पसार झालेल्या कामगाराला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. कानाराम उर्फ प्रवीण राजाराम जाट (३७) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानमधील सेवाडी गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काळाचौकीतील रहिवासी जितेंद्र मिश्रा यांचा लालबागमधील नारायण उद्योग भवनात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी कानाराम याने मिश्रा यांच्याकडे चालक म्हणून कामाला राहून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, कानाराम याने संधी साधत १० फेब्रुवारीच्या सकाळी मिश्रा यांच्या दुकानातील एक किलो १२५ ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पळ काढला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कानाराम विरोधात गुन्हा नोंदवत काळाचौकी पोलीस ठाण्याचे वपोनि संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. आरोपी कानारामने त्याच्या मोबाईलमधील सिम कार्ड फेकून देत तो टॅक्सी पकडून येथून निघून गेला होता. त्याने थेट राजस्थान गाठले. पोलिसांनी गुन्ह्यातील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कानारामचा नवीन मोबाईल नंबर शोधून त्याचे विश्लेषण केले. मात्र, कानाराम हा दर १० दिवसांत मोबाईल आणि सिमकार्ड तर, दर चार दिवसांनी बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी राजस्थानमध्ये जात स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी कानारामचा माग सुरु ठेवला. कानाराम हा एका टॅक्सी चालकाच्या मदतीने प्रवास करत असल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशीतून सापळा रचून कानारामला अटक केली आहे.