चांदीच्या मूर्तीची चोरी करणाऱ्या नोकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:01+5:302021-01-03T04:08:01+5:30
चांदीच्या मूर्तीची चोरी करणाऱ्या नोकराला अटक दिंडोशी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरकाम करणाऱ्या नोकराने मालकाच्या घरातील ...
चांदीच्या मूर्तीची चोरी करणाऱ्या नोकराला अटक
दिंडोशी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरकाम करणाऱ्या नोकराने मालकाच्या घरातील गणपतीची चांदीची मूर्ती पळवली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अंकित सिंह नावाच्या तरुणाला अटक केली. पळवलेली मूर्ती त्याच्या बिहारच्या घरी असलेल्या देव्हाऱ्यात पूजेला लावल्याचे उघडकीस आले.
मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या अरुण कइया यांच्या घरी सिंह ५ सप्टेंबर, २०२० रोजी घरकामासाठी रुजू झाला. ताे कइया यांच्या गॅरेजमध्ये राहू लागला. त्यांच्या देव्हाऱ्यातील चांदीची अर्ध्या किलोची गणपतीची मूर्ती त्याने २१ डिसेंबर २०२० राेजी पळवली. सिंह कामावर न आल्याने कइया यांनी त्याला फाेन केला. फाेन बंद हाेता. ताे गॅरेजमध्येही नव्हता. संध्याकाळी पूजा करताना गणपतीची मूर्ती गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सिंह हा बिहारच्या दरभंगाचा राहणारा असल्याचे समजताच परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे बिहारला त्याच्या घरी गेले. मात्र, तो तिथे नव्हता. तो मुंबईत काम करतो असे त्याच्या घरच्यांनी सांगितले. तसेच मूर्ती त्याने देव्हाऱ्यात ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार जाधव यांच्या पथकाने जवळपास एक लाख १० हजार किमतीची मूर्ती हस्तगत केली. त्यानंतर मुंबईतून तपासाअंती सिंहला अटक केली.
...............................