Join us

मालमत्तांच्या नोंदणी ॲपसह सर्व्हर ‘डाऊन’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 2:29 AM

मुद्रांक शुल्क कार्यालय; दस्त नोंदणीची रखडपट्टी

मुंबई: मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकासकांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे गेल्या काही दिवसांत मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार विक्रमी पद्धतीने वाढले आहेत. परंतु, हा वाढलेला भार मुद्रांक शुल्क विभागाच्या सर्व्हरला डोईजड झाला आहे. सर्व्हर सातत्याने डाऊन होत असून एक-एक दस्त नोंदणीसाठी पाच ते दहा मिनिटांऐवजी तासभर खर्ची पडत आहे. हा विलंब विकासक आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तापदायक ठरत आहे.सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत जाहीर केली. अनेक विकासकांनी उर्वरित दोन टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्यासोबत अनेक आकर्षक सवलती देणे सुरू केले. त्यामुळे गेल्या महिन्यात राज्यात केवळ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीची दीड लाख दस्त नोंदणी झाली. यंदा पहिल्या १५ दिवसांत या व्यवहारांनी एक लाखाचा पल्ला गाठला. त्याशिवाय मालमत्तांचे भाडे करार, कुलमुखत्यारपत्र, मालमत्तांचे हस्तांतरण, मृत्युपत्र यांसारख्या जवळपास ३२ प्रकारच्या व्यवहारांची नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत ऑनलान होते. नॅशनल इन्फाॅमेटिक सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून हे काम केले जाते.संपूर्ण महाराष्ट्रातील दस्त नोंदणीसाठी केवळ एकमेव सर्व्हर आहे. सहा वर्षांत त्याच्या क्षमतेत वाढ केली नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दस्त नोंदणीत विक्रमी वाढ झाल्यामुळे त्यात बिघाड निर्माण होत असल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.या आठवड्यात परिस्थिती येणार पूर्वपदावरगेल्या काही दिवसांत दस्त नोंदणीसाठी अनपेक्षित गर्दी वाढली. यंत्रणेतील तांत्रिक कारणांमुळे ही कामे करण्यास विलंब होत आहे. मात्र, येत्या आठवड्यात हा गोंधळ दूर होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा या विभागातील अधिकाऱ्यांनी केला. तसेच, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयीन कामकाज आता तीन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे.