- सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकांसह कोषागार (ट्रेझरी) कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालयातील संगणकांमधील डाटा सेव्ह करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारी सर्व्हर रूम जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. मात्र, या रूमची देखरेख करण्यासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र यंत्रणा तेथे उपलब्ध नाही. यामुळे येथे कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.डोंबिवलीतील कारखान्यात स्फोट होऊन झालेला अपघात हा निष्काळजी व दुर्लक्षितपणातून झाल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीद्वारे ते लवकरच उघड होणार, यात शंका नाही. शॉर्टसर्किट होऊन पाच वर्षांपूर्वी मंत्रालयास लागलेल्या आगीची धग अद्यापही विसरण्यासारखी नाही. असे असतानाच जिल्हाधिकारी, ट्रेझरी आणि न्यायालयाशी संबंधित असलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सचा महत्त्वपूर्ण डाटा सेव्ह करण्यासाठी भले मोठे सर्व्हर जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याची निगा राखण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे या रूममध्ये कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होण्याची दाट शक्यता आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास लागून असलेली ही सर्व्हर रूम सध्या स्टोअर रूमची भूमिकाही निभावत आहे. तुटलेल्या खुर्च्या, अस्ताव्यस्त पडलेला कचरा, भंगार झालेले लोखंडी व लाकडी कपाट आदी वापरात न येणारे भंगार सामान या सर्व्हर रूममध्ये अस्ताव्यस्त पडले आहे. ही सर्व्हर रूम वातानुकूलित ठेवणे आवश्यक आहे. पण, तेथे एक साधा पंखाही लावलेला नाही. अशी अडगळीत पडलेली ही खोली महत्त्वाचा व्हिडीओ कॉन्फरन्सचा डाटा सुरक्षित ठेवण्याची भूमिका निभावत असल्याचे वास्तव आहे.भंगार साहित्यासाठीही केला जातो वापरजिल्हाधिकाऱ्यांचे दालनही या रूमजवळ असून समिती सभागृहाला लागून हा सर्व्हर रूम आहे. समिती सभागृह वाढवण्यासाठी या रूमची जागाही वापरलेली आहे. यामुळे रूम आता अत्यंत कमी झाली असून अडगळीत पडली आहे. काही महिन्यांपूर्वी स्पॅन्को कंपनीकडून या सर्व्हर रूमची देखभाल करण्यासाठी खास तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होते. पण, आता या कंपनीचा कार्यकाल संपल्यामुळे सर्व्हर रूम भंगार साहित्याच्या स्टोअर रूमसाठीही वापरली जात आहे. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी या रूमकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.