अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टप्याटप्याने एसटीची सेवा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:26 PM2020-06-11T18:26:35+5:302020-06-11T18:27:35+5:30
शहरांतर्गत बेस्ट बसची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती केली आहे.
मुंबई : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट, एसटी धावत आहे. मुंबई शहरांतर्गत बेस्ट बस आणि मुंबई महानगरात एसटी बसची सेवा दिली जात आहे. मात्र शहरांतर्गत बेस्ट बसची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला जादा बस सोडण्याची विनंती केली आहे. आता एसटी महामंडळ टप्याटप्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त जादा बस धावणार आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसद्वारे केली जात आहे. तर, ८ जूनपासून अतिरिक्त २५० एसटी बस चालविल्या जात आहेत.
‘मिशन बिगीन अगेन’च्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. तर, खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यानंतर एसटीच्या अतिरिक्त २५० बस चालविण्यात आल्या. मात्र ८ आणि ९ जून रोजी बेस्ट आणि एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे प्रवाशांचा जादा भार कमी करण्यासाठी एसटी अतिरिक्त फेऱ्या चालविणार आहे. एसटी बसच्या फेऱ्या टप्याटप्याने वाढविल्या जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
----------------------------
रेड झोन आणि कंटेंटमेंट झोन वगळता गाव आणि तालुका एसटी बसची सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांची मागणी, संख्या यानुसार एसटी बसच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.