मनीषा म्हात्रे मुंबई : रात्री-अपरात्री स्मशानभूमीत एखादा मृतदेह आल्यास त्याच्यासाठी सरणावर लाकडे रचून त्याला अग्नी देणाऱ्या लाकूडवाल्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. ही जबाबदारी न घाबरता मुलुंड स्मशानभूमीत काम करणारे पप्पू रामलाल गौतम हे गेली २० वर्षे निष्ठेने पार पाडत आहेत. कोरोना काळात तर तब्बल १५ दिवस घरी न जाता सरणाशेजारीच त्यांनी रात्र काढली. २० वर्षांच्या आपल्या सेवेत त्यांनी ८० ते ८५ हजार मृतदेहांना अग्नी दिला.मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेले गौतम हे मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनीतील पालिका स्मशानभूमीत कंत्राटी पद्धतीने काम करतात. नालासोपारा येथे आई, वडील, पत्नी, ४ व १० वर्षांच्या मुलांसोबत राहणारे गौतम स्मशानभूमीतील भयाण शांततेत रात्रंदिवस कामात व्यस्त असतात. मृतदेह येणार असल्याचे समजताच ३०० लाकडे एकत्रित करून ती सरणावर रचणे, पालिका स्मशान कर्मचा-याला मदत म्हणून मृतदेहाला कुटुंबाने मुखाग्नी दिल्यानंतर, त्याला चारही बाजूने अग्नी देण्याचे काम ते करतात.स्मशानात कोरोना मृतदेह यायला सुरुवात झाल्याने आपल्यामुळे कुटुंबीयांना बाधा नको म्हणून त्यांनी आईवडिलांसह मुलांनाही गावी पाठवले. स्मशानभूमीत सरणाशेजारील लाकडांच्या ढिगा-यालगत असलेल्या खोलीतच १५ दिवस राहणे, खाणे आणि झोपणे, त्यानंतर एकदा घरी जाऊन येणे हा गौतम यांचा कोरोनाच्या काळातील दिनक्रम आहे.गौतम सांगतात, २० वर्षांपासून हेच काम करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत त्यांनी ८० ते ८५ हजार मृतदेहांना अग्नी दिला. यापूर्वी विलेपार्ले स्मशानभूमीत सेवा बजावली आहे. मृत व्यक्तींना काय घाबरायचे? इथे जिवंत माणसांचीच जास्त भीती आहे. त्यात कोरोनाला घाबरण्यापेक्षा स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.।सामाजिक जबाबदारीचे कामगावाकडे बरेच जण स्मशानातच काम करायचे. त्यामुळे त्यांच्या ओळखीने मलाही हीच नोकरी मिळाली. यात सुरूवातीला अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मी काय काम करतो याची चीड आणि भीती वाटत होती. मात्र हळूहळू वर्षांमागे वर्षे उलटत गेली. कुटुंबाची जबाबदारीही खांद्यावर आली. त्यात हे काम म्हणजे आपण एक सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे मग कधीच भीती वाटली नाही आणि काय काम करतोय म्हणून स्वत:चा रागही आला नाही, असे पप्पू रामलाल गौतम यांनी सांगितले.
स्मशानशांततेतील सेवा; न घाबरता, निष्ठेने सरणाशेजारीच काढतात रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:18 AM