मुंबई डबेवाल्यांची सेवा आजपासून ३१ मार्चपर्यंत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:48 AM2020-03-20T07:48:33+5:302020-03-20T07:48:47+5:30
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई डबेवाल्यांची सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने घेतला आहे.
मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई डबेवाल्यांची सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने घेतला आहे. यामुळे सुमारे दोन लाख चाकरमान्यांना घरच्या जेवणास मुकावे लागेल. परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा १ एप्रिलपासून सेवा नियमितपणे सुरू करण्यात येईल, असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
मुंबईत पाच हजार डबेवाला जेवणाचे जवळपास २ लाख डबे पोहोचवण्याचे काम करत आहेत. मुंबई डबेवाल्यांच्या १३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच सलग दहा दिवस सेवा बंद ठेवण्यात येईल. संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डबेवाल्यांनी हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या तीनही मार्गांवरून डबेवाले जेवणाचे डबे पोहोचवतात. प्रचंड गर्दीतून हे काम करावे लागते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केल्यानंतर मुंबई डबेवाला संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले.