लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईओडब्ल्यू) अटक करण्याच्या भीतीने नील यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान हा नील सोमय्यांच्या कंपनीत संचालक असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील यांनी एका प्रकल्पात गुंतविल्याचा आरोपही राऊत यांनी केला. त्यासंबंधी पुरावे त्यांनी मुख्यमंत्री व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिल्याची माहिती राऊत यांनी दिली होती. आपल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला तर अटकेपूर्वी ७२ तास आधी नोटीस देण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी नील सोमय्या यांनी केली होती.
मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, ते कोणत्याही एका प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मागत नाहीत. त्यामुळे सरसकट आदेश दिला जाऊ शकत नाही. याचिकादाराला पीएमसी बँक घोटाळ्यात अटक होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी तसे जामीन अर्जात नमूद करावे. न्यायालयाने नील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.