मुंबई : अल्पवयीन मुलीला वांद्रे येथील एका रेस्टॉरंट मध्ये डोळे मारणाऱ्या व तिच्याकडे आपला मोबाईल क्रमांक देणाऱ्या १९ वर्षीय आरोपी वेटरचा मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. २५ हजाराच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने वेटरची सुटका केली असून तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले आहेत.
वांद्रे हिल रोड येथील एका रेस्टॉरंटमध्ये १३ वर्षाची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत आली असता तेथे काम करणारा वेटर तिला पाहत होता त्याने तिला डोळा मारला तसेच एका कागदावर आपला मोबाईल क्रमांक लिहून त्या मुलीला दिला इतकेच नव्हे तर तिच्या मांडीला हात लावत त्याने तिला फोन करण्यास सांगितले. मुलीने ही हकीकत आपल्या पालकांना सांगितले त्यानंतर मुलीच्या वडिलांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायधीश कल्पना पाटील यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. सरकारच्या वतीने या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला मात्र आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, आरोपी हा निर्दोष असून त्याने पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले आहे तसेच तो घरातील कमावता असून त्याला अटक केल्यास त्याच्या कुटुंबियांवर परिणाम होईल न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत २५ हजाराच्या जात मुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला तसेच त्याला देश सोडून जाऊ नये पोलिसांनी बोलावल्यावर चौकशीसाठी उपस्थित राहावे अशा अटी घातल्या.