सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:44 IST2025-01-11T06:44:23+5:302025-01-11T06:44:48+5:30
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १० डिसेंबर २०२४ रोजी एस.व्ही. बर्वे रोडवरील अनेक वाहनांना धडक दिली

सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १० डिसेंबर २०२४ रोजी एस.व्ही. बर्वे रोडवरील अनेक वाहनांना धडक दिली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर मोरे याने जामिनासाठी अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. व्ही.एम. पाठाडे यांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. मोरेला जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली होती. न्यायालयाने ४ जानेवारी रोजी मोरेच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता.
मला बळीचा बकरा केले जात आहे...
- इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. बस कंत्राटदाराला आरोपीही केलेले नाही.
- कार्यालयात बसून मला इलेक्ट्रिक बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेस आपल्याला एकट्याला जबाबदार धरता येणार नाही, असे मोरे याने जामीन अर्जात म्हटले होते.