Join us

वीज बिल भरणा सुविधा नसल्याने एटीएम सेंटर उभारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 4:36 PM

Electricity bill payment facility : वीज बिल भरणा सुविधा नसल्यामुळे ग्राहकांची अडचण होते.

मुंबई : अनेक ठिकाणी ग्रामीण भागात महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरणा सुविधा नसल्यामुळे ग्राहकांची अडचण होते. ग्राहकांची ही अडचण सोडवण्यासाठी गाव पातळीवर एटीएम सेंटर उभारण्यात यावे, असे म्हणणे सबओर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने मांडले. फोर्ट येथील वीज कंपन्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सबओर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत महावितरण कंपनीने वीज जोडणी न तोडणे व हफ्त्यात वीज बिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. लॉकडाऊनमुळे वीज वसुली न झाल्यामुळे महावितरणला आर्थिक फटका बसला आहे.  माझी कंपनी, माझी जबाबदारी ही संकल्पना राबवून प्रथम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपले वीज बिल बँकेच्या माध्यमातून भरणा करावे, अशा सूचना त्यांनी मांडल्या. ग्राऊंडपातळीवर काम करत असताना येणाऱ्या अडचणी, वीज कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सबओर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने आपल्या सादरीकरणात केलेल्या सूचनांचे राऊत यांनी स्वागत केले. भरती प्रक्रिया व ग्राऊंड पातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याची मागणी असोसिएशनने केली. 

टॅग्स :वीजमुंबईमहाराष्ट्रनितीन राऊतमहावितरण