मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 09:31 PM2024-03-10T21:31:18+5:302024-03-10T21:38:31+5:30

रवींद्र वायकर हे आज सायंकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते.

Set back for Uddhav Thackeray in Mumbai mla Ravindra Waikar finally joins Eknath Shinde Shiv Sena | मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ravindra Waikar ( Marathi News ) : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलेले पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. रवींद्र वायकर हे आज सायंकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

मागील काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता.  जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपवल्याचा आरोप होता. 

दरम्यान, ईडी चौकशीमुळेच रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात होता. 

कोण आहेत रवींद्र वायकर?

रवींद्र वायकर मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. 

Web Title: Set back for Uddhav Thackeray in Mumbai mla Ravindra Waikar finally joins Eknath Shinde Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.