‘बीडीडी’साठी समिती स्थापन
By admin | Published: March 19, 2016 02:15 AM2016-03-19T02:15:02+5:302016-03-19T02:15:02+5:30
गेल्या काही दशकांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला चालना मिळाली आहे. या पुनर्विकासासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई: गेल्या काही दशकांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला चालना मिळाली आहे. या पुनर्विकासासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
हा प्रकल्प राबवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीत सार्वजनिक बांधकाम, गृह, वित्त, गृहनिर्माण, महसूल, नगरविकास, विधी व न्याय विभागांचे सचिव, तसेच पालिका आयुक्त आणि म्हाडाचे उपाध्यक्ष यांचा समावेश असेल. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुंबई मंडळ या प्रकल्पात नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे.
वरळी, नायगाव व ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींची जागा नाममात्र दराने म्हाडाला वर्ग करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शिवडी येथील बीडीडी चाळींची जागा ही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्याने केंद्राकडून सहमती प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा अंतर्भाव प्रकल्पात करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
धार्मिक स्थळांचा पुनर्विकास
अनधिकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण किंवा निष्कासन
किंवा स्थलांतरण याबाबत गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आल्यानंतर धार्मिक स्थळांचा पुनर्विकास प्रस्तावात समावेश केला जाईल. (प्रतिनिधी)
प्रशासकीय विभागांना सदनिका
शासकीय निवासस्थानांना सध्या बीडीडी चाळींमध्ये काही सदनिका भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. पुनर्विकासानंतर तेवढ्याच सदनिका संबंधित प्रशासकीय विभागांना उपलब्ध करून देण्यात येतील.