सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी समिती स्थापन
By admin | Published: February 12, 2017 02:10 AM2017-02-12T02:10:05+5:302017-02-12T02:10:05+5:30
राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, भविष्यात शहरीकरणामुळे यात आणखी वाढ होणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, प्रश्न हे इतर सहकारी
मुंबई : राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, भविष्यात शहरीकरणामुळे यात आणखी वाढ होणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, प्रश्न हे इतर सहकारी संस्थांपेक्षा भिन्न आहेत. परिणामी, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आणि याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ, सुस्पष्ट आणि परिपूर्ण होण्याकरिता सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाच्या पद्धतीसह त्याचे संनियंत्रण करण्यासाठी नियंत्रक/ प्राधिकरण सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्रचलित तरतुदीमध्ये बदल सुचवणे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचे व्यवस्थापन आणि दुरुस्तीसह सभासदांच्या तक्रारी सोडण्यासाठी उपाययोजना करणे. गृहनिर्माण संस्थांना लागू असलेल्या प्रचलित व कालबाह्य तरतुदींचा अभ्यास करून सहकार चळवळ लोकाभिमुख करण्यासाठी अधिनियमात अपेक्षित बदल करणे. सदनिका, बंगले, भूखंडांचा अभ्यास करणे.
गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजातील अडचणी सोडवण्यासाठी सेवाभावी संस्थांसह तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढणे; इत्यादी कामकाज समितीला करावे लागणार आहे.
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील सहकारी संस्थांचे सहनिबंधक संदीप देशमुख समितीचे अध्यक्ष आहेत.
मुंबई विभागातील सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक मोहम्मद आरिफ, सहकारी संस्थेचे सेवानिवृत्त अपर निबंधक
शेषराव सांगले, सेवानिवृत्त सहनिबंधक सुभाष पाटील, जिल्हा उपनिबंधक दिलीप उढाण, उपनिबंधक राजकुमार पाटील, गृहनिर्माण तज्ज्ञ आणि एम.एस.डब्ल्यू.ए.चे अध्यक्ष रमेश प्रभू, हाउसिंग फेडरेशनच्या
अध्यक्षा छाया आजगावकर, उपनिबंधक सोपान शिंदे हे समितीचे सदस्य असून, उपनिबंधक कैलास जेबले हे समितीचे सदस्य
सचिव आहेत. (प्रतिनिधी)