मुंबईतील प्रत्येक वाॅर्डात किमान दोन लसीकरण केंद्र उभारा - काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:06+5:302021-04-30T04:09:06+5:30
काँग्रेसची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. ...
काँग्रेसची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. त्यासाठी मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांतील लसीकरणासाठी राज्य सरकारने प्रत्येक वॉर्डात किमान दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.
मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारने अभिनंदन करतानाच भाई जगताप यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा उपस्थित होते. लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार असला तरी पुरेसा लस साठा नसल्याने विलंब होण्याची शक्यता अधिक आहे. केंद्र सरकारकडून राज्याला पुरेसा लसींचा साठा मिळालेला नाही. महाराष्ट्र सरकार मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करते. पण केंद्र सरकार महाराष्ट्रासह सर्व राज्यांना लसींचा मोफत व पुरेसा पुरवठा करत नाही आहे, असा आरोप जगताप यांनी केला.
गुरुवारी हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे की, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व्हायला पाहिजे. राज्यातील आणि मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली, तरीसुद्धा या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ विनंती आहे की त्यांनी जर आवश्यक असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जाहीर करावा. असा जर लॉकडाऊन महाराष्ट्र सरकारने लागू केला, तरी जे छोटे व्यापारी आहेत व त्यांच्याजवळ काम करणारे कामगार आहेत, त्यांच्याबद्दल सरकारने संवेदनशील विचार करावा.