Join us

संचमान्यता ३१ मार्चच्या विद्यार्थी संख्येवर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:07 AM

मुंबई : शासकीय योजना व अनुदानासाठी केंद्र सरकारने आधार कार्डचे तपशील देण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली.

मुंबई : शासकीय योजना व अनुदानासाठी केंद्र सरकारने आधार कार्डचे तपशील देण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही शाळांच्या संचमान्यतेसाठी आधार कार्ड तपशील देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे केली आहे. शिवाय संचमान्यता करताना ३१ मार्चच्या विद्यार्थी संख्येचा आधार घेण्याचे आवाहनही केले आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या संख्येवर शाळांची संचमान्यता ठरत असते. संचमान्यतेच्या नवीन निकषानुसार प्राथमिक विभागात ३० विद्यार्थ्यांमागे एक, तर उच्च प्राथमिक विभागात ३५ विद्यार्थ्यांमागे एक असे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण असते. या प्रमाणात विद्यार्थी संख्येत एक विद्यार्थी जरी कमी असला, तरी त्या शाळेतील एका शिक्षकाचे पद कमी होऊन शाळेतील शिक्षक अतिरिक्त होतो. राज्यातील आधार न काढलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली, तर याचा मोठा फटका शिक्षकांना होणार आहे. त्यातच सरल प्रणालीवरील माहिती भरण्याची मुदत उलटून गेली आहे व शिक्षण विभाग संचमान्यता करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शेवटच्या मुलाची माहिती ‘सरल’वर आल्याशिवाय संचमान्यता करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे बोरनारे यांनी सांगितले. शासनाने संचमान्यता केल्यास त्याचा मोठा फटका मुंबईसह राज्यातील शाळांमधील शिक्षकांना बसणार आहे. कारण जर विद्यार्थ्याने आधार कार्ड काढले नसेल, तर संचमान्यतेत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. परिणामी, विद्यार्थ्याने आधार कार्ड काढले नाही, तर त्याची शिक्षा केवळ शिक्षकांनाच का, असा सवालही शिक्षक परिषदेने उपस्थित केला आहे. तसेच शिक्षकांसोबत शिक्षणाधिकारी व शालेय शिक्षण विभागातील अधिकाºयांनाही अतिरिक्त ठरविणार का, असा सवालही त्यांनी शिक्षण विभागाला केला आहे.