Join us

भांडुपच्या मंडईतील गाळ्यांबाबत तोडगा काढा

By admin | Published: June 26, 2015 1:51 AM

भांडुप (पश्चिम) रेल्वे स्टेशनलगतच्या महापालिकेच्या मंडईतील काही गाळे सील करण्याच्या मुद्द्याबाबत तातडीने योग्य तो तोडगा काढून गाळेधारकांना

मुंबई : भांडुप (पश्चिम) रेल्वे स्टेशनलगतच्या महापालिकेच्या मंडईतील काही गाळे सील करण्याच्या मुद्द्याबाबत तातडीने योग्य तो तोडगा काढून गाळेधारकांना दिलासा द्यावा, अशी सूचना बाजार व उद्यान समिती अध्यक्ष अजित भंडारी यांनी महापालिकेच्या बाजार विभागाला दिली. ‘एस’ विभागातील मंडई व उद्यानांचा पाहणी दौरा करून आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असेही आदेश त्यांनी महापालिकेच्या संबंधित खात्यांना दिले.मंडईच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो हे लक्षात घेऊन याबाबतीत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही भंडारी यांनी दिले. त्यानंतर त्यांनी विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर परिसरात असणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड उद्यानास भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व परिसरातील लहान मुलांबरोबर संवाद साधला. लहान मुलांनी उद्यानातील तुटलेली खेळणी, उद्यानामध्ये लॉन व्यवस्थित नसणे यासारख्या उद्यानाशी संबंधित विविध समस्या त्यांच्याकडे मांडल्या. या सर्व समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे व संबंधित कंत्राटदाराला योग्य ते आदेश देण्याचे निर्देश त्यांनी उद्यान विभागास दिले.टागोर नगरमधील महात्मा जोतिबा फुले उद्यानास भेट देऊन तेथील समस्यांचा आढावा घेतला व परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. शिवाय टागोर नगरमधील जनता विद्यालयाजवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणास त्यांनी भेट दिली. या मैदानाच्या एका कोपऱ्यात खासगी व्यावसायिकाने त्याचे साहित्य ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच साहित्याबाबत महापालिकेच्या नियमांनुसार तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)