मुंबई - यंदा मुंबईच्या बीचेसवर विशेषत: पश्चिम उपनगरात जुहू, जुहू सिल्व्हर बीच, अकसा येथे मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या घडाप्रमाणे जेलीफिश आले असून अनेक पर्यटकांना जेलीफिश चावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता, 13 सप्टेंबरपासून येणारा गणेशोत्सव लक्षात घेता गणेश भक्त, महिला व लहान मुले गणपती विसर्जनवेळी समुद्राच्या पाण्यात उतरतात. त्यामुळे त्यांना जेलीफिश डंख मारण्याची दाट शक्यता आहे. जेली फिशच्या डंखामुळे जखमी होणाऱ्या गणेश भक्तांवर त्वरित उपचार करण्यासाठी बीचेसवर तसेच पालिका रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करा, अशी मागणी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
जेलीफिशवर प्रभावी ठरणाऱ्या औषधांचा साठा रुग्णालयात उपलबध करून देणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्रात जेलीफिशची दहशत आणि पालिकेकडून कोणती उपाययोजना करावी याचे विवेचन त्यांनी विषद केले आहे. जेलीफिश संदर्भात गणेश भक्तांमध्ये आणि मुंबईतील सर्व गणेश मंडळांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणाऱ्या माहिती पत्रकांचे वितरण केले पाहिजे. जेणेकरून गणेश भक्तांमध्ये जेलीफिश बाबतची भीती कमी होईल असे ठाम मतही नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केले. सन 2016 मध्ये गणेश भक्तांना विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर जेली चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटना यंदाच्या गणेशोत्सवात घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने सावधगिरी बाळगून यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्तांना भेटून आपण पत्र दिल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, लोकमतने सातत्याने जेली फिशबाबतच्या बातम्या देऊन मुंबईकरांमध्ये जनजागृती केल्याबद्धल नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतला धन्यवाद दिले आहेत. जेलीफिशच्या दहशतीबाबत लोकमत ऑनलाईन व लोकमत वृत्तपत्रातून जनजागृती करून लोकमतने पालिका प्रशासनाला अकसा,जुहू येथे 108 क्रमांकाची अँम्ब्युलन्स प्रथमच ठेवणे भाग पाडले.आणिे आपल्या आजपर्यंत 39 वर्षे जीवरक्षक म्हणून काम केल्याच्या इतिहासात प्रथमच बीचेसवर डॉक्टर सह सुसज्ज अँम्ब्युलन्स ठेवण्यात आली अशी माहिती अकसा येथे सेवानिवृत्तीनंतर एक सामाजिक बांधिलकी जपणारे आपली सेवा देणारे अनुभवी जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली.