उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँम्फोटेरिसीन बी व टोसिलीझुमॅब यासारख्या आवश्यक औषधांचा पुरवठा सेलिब्रिटी व राजकीय नेते करत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने प्रोटोकॉल बनवावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
व्यक्तीला रुग्णालयात किंवा कोणत्याही ठिकाणी या औषधांची आवश्यकता लागल्यास ती मिळावी, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सल्ल्याने यंत्रणा उभारण्याची आम्ही वाट पाहात आहोत, असे न्या. एस. पी. देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.
कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसणे, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा, इत्यादी समस्यांबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले.
गरजू व्यक्तींना काही सेलिब्रिटी व राजकीय व्यक्ती तत्काळ औषधे उपलब्ध करत असलेल्या बाबीची दखल घेत उच्च न्यायालयाने सरकारनेही अशाप्रकारे गरजू लोकांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारशी सल्लामसलत करून एक यंत्रणा बनवावी. सरकारने तसे जाहीर करावे. आम्ही त्याची वाट पाहात आहोत, असे न्यायालयाने म्हटले.
कोरोनाला हाताळण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण काही सेलिब्रिटी आणि राजकीय नेते अशाप्रकारे गरजूंना औषध पुरवून ‘मसिहा’ बनत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत याचिकांवरील पुढील सुनावणी २५ जून रोजी ठेवली आहे.
..............................