Join us

Ashish Shelar vs Uddhav Thackeray: "कोरोनाकाळात ज्यांनी खाल्ले खोके, त्या बोक्यांची 'कॅग'मार्फत चौकशी एकदम ओक्के"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 7:37 PM

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचा खोचक टोला

Ashish Shelar vs Uddhav Thackeray: मुंबई महालिकेतील १२ हजार कोटींच्या कंत्राटांची विशेष कॅग (CAG) मार्फत चौकशी होणार आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. 'माजले होते बोके, कोरोनाकाळात खाऊन खोके.. त्यांची कॅगमार्फत चौकशी म्हणजे एकदम ओक्के', अशी खोचक प्रतिक्रिया भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली. मुंबई भाजपा कार्यालयात आज शेलार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची (Mumbai BMC Corruption) चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे जोरदार स्वागत केले.

याबाबत आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले, "मुंबई महापालिकेत अपहार, दुराचार आणि भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही सातत्याने सांगत होतो. या सगळ्याचे पेव माजले असून त्याला थांबवले पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला आश्वासित केले होते की, विशेष लेखा परिक्षण करू. आता मा. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश निर्गमित केल्याची माहिती आहे. २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दहा वेगवेगळ्या विभागात जवळजवळ १२ हजार १३ कोटी रुपयांची जी कंत्राटी दिली गेली. त्या संबंधित हा घपला आहे."

"कोरोना काळात सामान्य मुंबईकर जीव कसा वाचेल या भीतीमध्ये असताना त्याच काळात सत्तेत बसलेल्यांना 'माझा कंत्राटदारांकडून खिसा कसा भरेल' याची भ्रांत होती. कोरोना काळात ३ हजार ५३८ कोटींची खरेदी झाली. त्याची चौकशी होणार आहे. जनतेला आवश्यक म्हणून घेतलेला भूखंड त्या अजमेरा कॉन्ट्रॅक्टरला ॲक्वीझिशेनमधे पैसे दिले किती? ३३९ कोटी रुपये पण अजमेरा कॉन्ट्रॅक्टरने तो भूखंड २ ते अडीच कोटी रुपयाला विकत घेतला. एका बाजूला अडीच कोटी रुपयांना भूखंड घ्यायचा, तोच भूखंड महानगरपालिकेने ३३९ कोटी रुपयांना विकत घ्यायचा हे भूखंडाचे श्रीखंड खाल्ले गेले त्याची चौकशी होणार आहे," असे शेलारांनी स्पष्ट केले.

"चार पुलांची बांधकामे याच काळात झाली. पूल चार आणि खर्च १ हजार ४९६ कोटी रुपये. अमर्याद खर्च करण्यात आला. करोना काळात रुग्णालयात आवश्यकता दाखवून खरेदी झाली ती ९०४ कोटींची... या ३५३८ कोटी मध्यवर्ती खरेदी, ९०४  कोटी रुग्णालयातील खरेदी म्हणजे चार साडेचार कोटी रुपयांची खरेदी.. कंत्राटदार कंपन्या बोगस, एकच कंत्राटदार, जवळच्या नातेवाईकांना कंत्राट यातून मलिदा कमवायचा कार्यक्रम चालू होता," असा आरोप त्यांनी केला.

"पावसाळ्याच्या कालावधीत ५६ रस्त्यांची दुरुस्ती केली आणि त्यावर २२०० कोटी रुपये खर्च केले  तरी मुंबईकरांच्या गाड्या खड्ड्यात आहेत. याची चौकशी होणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरच झाले नाहीत तरी त्यावर १०४९ कोटी खर्च झाले. तीन मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सुरू  ११८६ कोटी खर्च झाले. यांनी कचऱ्यात ही खायचे सोडले नाही. घनकचरा व्यवस्थापनात अजून ही देवनार प्रकल्प सुरू झाला नाही तरी १०२४ कोटी खर्च झाले. २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत चौकश्या होणार आहेत. 'माजले होते ते बोके, करोना काळात खावून खोके, त्या सगळ्यांची संपूर्ण चौकशी एकदम ओक्के'. भारतीय जनता पक्षाची अशी मागणी आहे की, मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या  गैरव्यवहारप्रकरणी सत्य जनतेसमोर आले पाहिजे. ज्या माजलेल्या बोक्यांनी कोरोना काळात जे खोके खाल्ले त्याचा चेहरा एका महिन्यात उघडा झाला पाहिजे," अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआशीष शेलारउद्धव ठाकरेमुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुक 2022