Join us

उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 7:14 PM

एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

मुंबई, दि. 28 - एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त सनदी अधिकारी के.पी.बक्षी यांची एकसदस्यीय चौकशी समिती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. के.पी.बक्षी हे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव आहेत. ही एक सदस्यीय समिती गेल्या 15 वर्षांतील याबाबात घेण्यात आलेले निर्णय तपासणार आहे. याचबरोबर, या समितीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे येथील एमआयडीसी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या  वाढत्या मागणीनंतर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्दही केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा फेटाळला आणि याप्रकरणी चौकशी करुन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. तसेच, या चौकशीअंती जो निष्कर्ष असेल तो आपल्याला मान्य असेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही म्हटले होते. दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. तसेच, धनंजय मुंडे म्हणाले की, एक सदस्यीय चौकशी समिती म्हणजे मंत्र्यांना वाचवण्याचा एक प्रकारचा हा प्रयत्नच आहे.