Join us

तुंबणाऱ्या ७० ठिकाणांवर पावसाळ्यानंतर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:46 AM

४३ ठिकाणी अद्याप काम सुरू : उर्वरित ठिकाणची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर पूरमुक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून अनेक उपाययोजना महापालिकेमार्फत सुरू आहेत. मात्र पाणी तुंबण्याची ठिकाणं कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३३६ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.

यापैकी १६९ ठिकाणे पूरमुक्त करण्यात आली असून ४३ ठिकाणी अद्याप काम सुरू आहे. तर ७० ठिकाणी पावसाळ्यानंतर काम सुरू होणार आहे. मुंबईत अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खोलगट असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात भरती आल्यास पाणी साचण्याचे प्रकार घडतात. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुराच्या अनुभवानंतर महापालिकेने ब्रिमस्टोवेडअंतर्गत मुंबईत आठ ठिकाणी पंप बसविणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवल्यामुळे पाणी साचणारी ठिकाणे कमी होत आहेत. या प्रयत्नांमुळे मुंबईतील २२३ ठिकाणे पूरमुक्त झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.

सन २०१७ मध्ये मुंबईत २२५ ठिकाणी पाणी साचत होते. मात्र २०१८ मध्ये ४८ आणि २०१९ मध्ये ६३ ठिकाणाची यात भर पडल्याने एकूण पाणी साचणारी ठिकाणे ३३६ झाली होती. पालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर यापैकी १६९ ठिकाणं पूर्ण मुक्त झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.

४३ ठिकाण अशी आहेत जिथे पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. मात्र पाणी तुंबणाºया ७० ठिकाणी आता पावसाळ्यानंतर उपाय योजना केल्या जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.