मुंबई : इंजिनीअरिंग किंवा मेडिकल या क्षेत्रांसोबतच अन्य आवश्यक माहिती आणि उपयुक्त मार्गदर्शनासाठी सीईटी सेल पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया आणि विद्यार्थी-पालकांमधील सेतू बनणार आहे. व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे निकाल लावल्यानंतर आता त्यासंदर्भातील माहितीसाठी सीईटी सेलकडून राज्यात ३०० हून अधिक सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
७ जूनपासून सुरूझालेल्या या सेतू केंद्रांवर एखाद्या समस्येचे समाधान न झाल्यास विद्यार्थ्याला सीईटी आयुक्तांशीही केंद्रावरून संवाद साधता येणार असल्याची माहिती आयुक्त आनंद रायते यांनी दिली. परीक्षांचे निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सीईटीच्या निकालानंतर निर्माण झालेला पर्सेंटाईल गुणांचा गोंधळ, प्रवेश अर्ज भरताना झालेली चूक, प्रवेश प्रक्रियेसाठी दाखल कराव्या लागणाऱ्या प्रमाणपत्रांची माहिती केंद्रांवर मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरसाठी योग्य पर्याय उपलब्ध आहेत याची माहितीसुद्धा सेतू केंद्रांवर मिळेल. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल.
तालुकानिहाय सेतू केंद्रांची माहिती सीईटी सेलच्या ‘सार’ या पोर्टलवर मिळेल. सर्वाधिक ७१ सेतू केंद्रे पुणे विभागात असून त्यानंतर नाशिकमध्ये २३, अहमदनगर २१, तर नागपूर विभागात २० केंद्रे आहेत. मुंबई शहरात ४ तर मुंबई उपनगरात ५ सेतू केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर होण्यास मदतसेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा असल्याने त्यांना प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी महाविद्यालय किंवा संस्थेकडे जावे लागणार नाही. या केंद्रावर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश निश्चित करणे सोपे होईल; तसेच प्रवेश प्रक्रियेत येणाºया अडचणी दूर होण्यास मदत होईल. - आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल