लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे वरळी सी लिंक सारख्या ‘प्रस्थापित’ मार्गावर टोल वसुलीसाठी आता कंत्राटदारच मिळेनासा झाला आहे. या कामाच्या पहिल्या निविदेस मुदतवाढ दिल्यानंतरही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएसआरडीसी) नव्याने निविदा प्रसिद्ध कराव्या लागल्या आहेत. या वृत्ताला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दुजोरा दिला.
जून, २००९ मध्ये लोकार्पण झालेल्या सी लिंकवरील टोल वसुलीचे काम शेवटच्या टप्प्यात एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे होते. त्यांचा करार ३० जानेवारी, २०२० रोजीच संपला. त्यानंतर सी लिंकची देखभाल, दुरूस्ती आणि टोल वसुलीसाठी एमएमआरडीए सी लिंक लिमिटेड (एमएसएलएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.
फेब्रुवारीत या टोलसाठी नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. २०३९ सालापर्यंत टोल वसुलीचे अधिकार नव्या कंत्राटदाराला दिले जाणार असून त्यातून किमान २ हजार ९४० कोटी रुपयांचे उत्पन्न एमएसआरडीसीला अपेक्षित आहे. ३० जुलैपासून नव्या कंत्राटदारामार्फत वसुली सुरू करायची, हे उद्दिष्ट ठेवत फेब्रुवारीत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्याला २८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्या मुदतीतही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्या सादर करण्याची नवी मुदत १५ सप्टेंबर आहे.लॉकडाऊनचा परिणामच्घसघशीत उत्पन्न मिळवून देणाऱ्या या सी लिंक रोडच्या टोल कंत्राटावर अनेक बड्या नामांकित कंपन्यांचा डोळा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोरोनापाठोपाठ दाखल झालेल्या लॉकडाऊनमुळे सारे गणित बिघडले.च्परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने कंपन्या प्रतिसाद देतील. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर नोव्हेंबर महिन्यापासून नव्या कंत्राटदारामार्फत टोल वसुली सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.