Join us

जयपूर एक्सप्रेसखाली सापडून सात म्हशी ठार

By admin | Published: March 08, 2017 3:03 AM

मुंबईकडे भरधाव वेगाने जात असलेल्या जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या. ही घटना विरार रेल्वे स्टेशननजीक दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडली.

वसई : मुंबईकडे भरधाव वेगाने जात असलेल्या जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या. ही घटना विरार रेल्वे स्टेशननजीक दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.दुपारी सव्वा एकच्या दरम्यान जयपूर-बांद्रा एक्सप्रेस मुंबईकडे वेगाने जात होती. विरार रेल्वे स्टेशनपासून साधारण एक किलोमीटर दूर असलेल्या रेल्वे यार्ड परिसरात काही म्हशी रेल्वे क्रॉसिंग करीत होत्या. त्याचवेळी जयपूर एक्सप्रेस वेगाने आली. यावेळी सात म्हशी गाडीखाली चिरडून ठार झाल्या. गाडीचा वेग इतका होता की ती थेट विरार रेल्वे स्टेशनजवळ येऊन थांबली. म्हशींचे मृतदेह इंजिनसह काही डब्याखाली अडकून पडल्याने ते काढण्यासाठी तब्बल चार तास लागले. तोपर्यंत ट्रेन थांबवण्यात आली होती. एक्सप्रेसमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना लोकलने पुढचा प्रवास करावा लागला. अपघातामुळे लोकल सेवेवर परिणाम होऊन गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत होत्या. तर लांबपल्ल्यांच्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. विरार, वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर रेल्वे स्टेशन दरम्यान गायी-म्हशी मोकळ््या सोडल्या जात असतात. त्यामुळे अधूनमधून एखाद दुसरे जनावर गाडीखाली येऊन ठार होत असते. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होत असतो. म्हणूनच स्थानिकांनी आपली जनावरे मोकळी न सोडता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.