मुंबईतून सहा महिन्यांत सव्वा कोटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:56 AM2017-10-30T01:56:59+5:302017-10-30T01:57:47+5:30
राज्यात गुटखाबंदी झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गुटखासाठ्याची वाहतूक सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून दिसून आले आहे
मुंबई : राज्यात गुटखाबंदी झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गुटखासाठ्याची वाहतूक सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून दिसून आले आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ या काळात अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई शहर-उपनगरांतून तब्बल ४६ ठिकाणी छापे टाकून १ कोटी २४ लाख ११ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मुंबईतील विशेषत: बी, सी आणि डी वॉर्डात, म्हणजेच भेंडीबाजार, महमद अली मार्ग, ग्रँटरोड, डोंगरी, नानाचौक, क्रॉफर्ड मार्केट असा परिसर येतो. याच भागांमध्ये गुटखाविक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत सर्वाधिक गुटखा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) बी. यू. पाटील यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुटखाविक्री करणाºयांवर कायम लक्ष असते. मुंबईतील काही परिसरातून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ४६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये गुटख्यांची पाकिटे विक्रीसाठी ठेवल्याचेही आढळून आले असून याची बाजारभावानुसार किंमत एक कोटी २४ लाख ११ हजार ३२५ रुपये इतकी आहे. आॅगस्ट महिन्यात पाच छापे टाकण्यात आले. यातून १७, 0१, ९७0 रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला होता. तसेच सप्टेंबरमध्ये आठ छापे मारून २१,०१,१७६ रुपयांचा गुटखा जप्त केला. तर आॅक्टोबर महिन्यात गेल्या १५ दिवसांत दोन छापे टाकले असून, ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.