सात कोटींची सिटीस्कॅन मशिन ‘धूळखात’, सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्रकार, रुग्णांना नाहक मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:44 AM2018-01-11T02:44:15+5:302018-01-11T02:44:26+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी असणा-या सेंट जॉर्ज रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी जर्मनीहून दाखल झालेली सिटीस्कॅन मशिन वर्ष उलटले, तरी ‘धूळखात’ पडली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत जर्मनीहून आलेली ही मशिन अजूनही वापरण्यात आलेली नाही.
- स्नेहा मोरे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी असणा-या सेंट जॉर्ज रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी जर्मनीहून दाखल झालेली सिटीस्कॅन मशिन वर्ष उलटले, तरी ‘धूळखात’ पडली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत जर्मनीहून आलेली ही मशिन अजूनही वापरण्यात आलेली नाही.
सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनाने सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनासोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर, गेल्या वर्षी तब्बल ७ कोटींचा निधी खर्चून अत्याधुनिक सेवा-सुविधांनी परिपूर्ण मशिन रुग्णालयात दाखल झाली. मात्र, बराच काळ ती रुग्णालयाच्या इमारतीच्या आतील आवारातच पडून होती. दोन महिन्यांपूर्वी ती सटीस्कॅन विभागात बसविण्यात आली आहे. मात्र, अजूनही सेवा सुरू झालेली नाही.
सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटीस्कॅनची सेवा उपलब्ध नसल्यामुळे येणाºया रुग्णांनी अन्य रुग्णालयात जावे लागते. या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे ५०० रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, सिटीस्कॅन करण्यासाठी या रुग्णांना सर जे. जे. रुग्णालय वा गोकुळदास तेजपाल रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय तपासण्या करून घेण्यासाठी धावाधाव करावी लागते.
रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन ही अत्याधुनिक सेवा रुग्णालयात आणली आहे. मात्र, अजूनही हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्याने सेवेची सुरुवात करण्यात आलेली नाही. शासनाकडे मनुष्यबळाची मागणी करण्यात आली असून, ती पूर्ण झाल्यास ही सेवा सुरू होईल. - डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय.
सिटीस्कॅन सेवेचे खासगीकरण करण्याचा डाव आहे. यापूर्वी गोकुळदास तेजपाल रुग्णालयातही या सेवा खासगी कंपनीकडे दिल्या आहेत. त्यामुळे या चाचण्यांचे दर महाग असून सामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. अन्य शासकीय रुग्णालयातील अधिकचे रेडिओलॉजिस्ट्सची नियुक्ती सेंट जॉर्जमध्ये करून ही सेवा सुरू करण्यात येऊ शकते.
- संजय गुरव, अभ्यागत मंडळ सदस्य, सेंट जॉर्ज रुग्णालय.