चाचणी निगेटिव्ह आल्यास सात दिवस क्वारंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:12+5:302020-12-29T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी १४ दिवस अनिवार्य क्वारंटाइन आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी १४ दिवस अनिवार्य क्वारंटाइन आहे. मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सात दिवसात संस्थात्मक क्वारंटाइन सुटका होणार आहे. मात्र त्यांना सात दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने रविवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांना आल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाइन ठेवले जाईल आणि संबंधित हॉटेल्समध्ये आल्यापासून सातव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाईल. तर चाचणीचा अहवाल नकारात्मक आढळल्यास सात दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइननंतर सुटका होणार आहे. तसेच या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन अनिवार्य असणार आहे. अशा प्रकारे प्रवासी एकूण १४ दिवस क्वारंटाइन असल्याची खात्री करून घेतली जाईल, असे मुंबई महापालिकेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
तर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना पुढील मूल्यांकन आणि उपचारांसाठी यूकेसाठी सेव्हन हिल्स आणि जीटी हॉस्पिटलसारख्या नामांकित सीओव्हीआयडी-१९ हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. तसेच परदेशी दूतावास कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनमधून सूट देण्यात आली आहे.