CoronaVirus News in Mumbai: ‘शताब्दी’त २४ तासांत सात मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:43 AM2020-05-02T00:43:16+5:302020-05-02T00:43:32+5:30
हे सर्व मृत्यू रुग्णालयातील नसल्याचा दावा आरोग्य समिती अध्यक्षांनी केला आहे.
मुंबई : बोरीवलीतील ‘नॉन कोविड’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या शताब्दी रुग्णालयात गेल्या चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. हे सर्व आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होते, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र हे सर्व मृत्यू रुग्णालयातील नसल्याचा दावा आरोग्य समिती अध्यक्षांनी केला आहे.
शताब्दी रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास रुग्णांना ठेवण्यात आले होते. ते सर्व संशयित असल्याने त्यापैकी एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दाखल रुग्ण हे पन्नाशीच्या आतीलच होते. ज्यांना छातीत दुखणे, सर्दी-खोकल्यासारखे आजार होते. नवशिक्या डॉक्टरकडे त्यांची जबाबदारी आहे. परिणामी, त्यांच्यावर नेमका उपचार काय करायचा हेच त्यांना माहीत नसल्याने लोकांचा नाहक बळी गेल्याचे रुग्णालय सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वीदेखील शताब्दी रुग्णालयात परिचारिकांनी संप पुकारला होता. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासन खेळत असून त्यांना आवश्यक ते पीपीई किट पुरविले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबत रुग्णालय अधीक्षक प्रमोद नगरकर यांना विचारले असता, ‘रुग्णालयात सात रुग्णांचा मृत्यू हा त्या मानाने मोठा आकडा नाही. नेहमी पाच किंवा सहा जणांचा मृत्यू रुग्णालयात होतच असतो. सध्या माझ्याकडे याबाबत माहिती नसून तुम्ही उद्या सकाळी फोन केल्यास मी तुम्हाला ती देऊ शकेन,’ असे उत्तर त्यांनी।दिले. त्यानुसार ‘लोकमत’ने आरोग्य समिती अध्यक्षांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनीही असा काही प्रकार नसल्याचा दावा केला.
>हलगर्जीपणा नाहीच!
रुग्णालयात एक जण कोरोनाने मरण पावला, तर तीन जण हे रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल होते. उरलेले तीन हे रुग्णालयात आणण्यापूर्वीच मयत झाले होते. त्यामुळे डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही.
- अमेय घोले, आरोग्य समिती अध्यक्ष